वाघीणीच्या शिकारीप्रकरणी एक संशयित ताब्यात


सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील वाघीण शिकार प्रकरणी तपास युध्दपातळीवर सुरु आहे. या प्रकरणी आज गावातील एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघीण शुक्रवारी मृतावस्थेत आढळली होती. या वाणीणीचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिची शिकार करण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात कक्ष क्रमांक 123 मध्ये हरणे मारण्यासाठी जे तारेचे फासे लावण्यात येतात. ते फासे आढळून आल्याचे दिसत होते. या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असून सदर घटना दोन दिवसांपूर्वीची होती.

ताडोबाच्या गाभा क्षेत्रात शिकार झाल्याच्या घटनेचे खळबळ माजली. घटनेचे गांभीर्य पाहता ताडोबा वनपरिक्षेत्रातील कोअर झोन मध्ये वाघिणीच्या झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. परिणामी युद्धपातळीवर शिकारींचा शोध सुरु झाला.

ताडोबातील पळसगाव पासून सुमारे दीड ते दोन किमी अंतरावर सदर घटना घडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा यात हात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. श्वान पथकाच्या मदतीने शिकारींचा शोध घेण्यात आला. पळसगाव हे कोअर झोन मधील गाव असून येथे सुमारे 140 कुटुंब आहेत. या गावाचे पुनर्वसन वरोरा तालुक्यातील सालोरी गावाजवळ होत असून 20 कुटुंबांनी येथील घराचा ताबा देखील सोडला आहे. उर्वरित गावकरीही हे गाव सोडून जाणार आहेत. त्यामुळे संशयाची सुई गावकऱ्यावर आहे. त्या दृष्टीने तपास सुरु आहे. सोमवारी गावातील एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी केली जात आहे.