पहिल्याच चोरीत आत गेला!

सामना ऑनलाईन । मुंबई

खिशातील मोबाईलच नव्हे तर मोबाईलचे दुकानेही सुरक्षित नाहीत. कांदिवलीत चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडून हातसफाई करीत लाखो रुपयांचे मोबाईल लंपास केले. कांदिवली पोलिसांनी अवघ्या काही तासांत अविनाश पवार या चोरट्याला पकडले. विशेष म्हणजे तो पहिल्यांदाच चोरीच्या क्षेत्रात उतरला आणि तुरुंगात गेला.

कांदिवलीच्या पश्चिमेकडील एकतानगरातील प्लाझा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान चोरट्याने फोडले. या दुकानातील विविध कंपन्यांचे सुमारे आठ लाखांचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, उपनिरीक्षक संदीप पाचांगणे यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस शिपाई शिरकर यांनी अविनाश याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या अविनाश याने चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून ओपो, सॅमसंग, एमआय, नोकिया, जिओनी, कार्बन, आयटेल अशा विविध कंपन्यांचे ३३ मोबाईल जप्त केले. चोरीचे इतर मोबाईल त्याचे साथीदार घेऊन पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चौकशीमध्ये आणखी एक माहिती समोर आली ती म्हणजे अविनाश याचा हा पहिलाच प्रयत्न होता. याआधी त्याची कोणतीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. साथीदारांनी झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याला चोरी करण्यास भाग पाडले.