एक हजार वर्षापूर्वीची कृष्णाची मूर्ती व शिलालेख सापडला, अनेक रहस्य उलगडणार

1

सामना ऑनलाईन । इंदूर

हजारो वर्षांची संस्कृति लाभलेल्या हिंदुस्थानमध्ये खोदकामादरम्यान अनेक ऐतिहासिक वस्तू सापडतात असतात. या वस्तूंचे मोलही प्रचंड असते. मध्यप्रदेशमधील इंदूरपासून जवळपास 100 किलोमीटर दूर धार येथे श्रीकृष्णाची 1 हजार वर्षापूर्वीची मूर्ती आणि शिलालेख सापडला आहे. पुरातत्व विभागामध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण असून यामुळे अनेक रहस्य उलगडणार आहेत.

धार जिल्ह्यातील ऐतिहासिक नगर मांडू येथे एका स्ट्रक्चरचे खोदकाम सुरू असताना श्रीकृष्णाची हजार वर्षापूर्वीची मूर्ती सापडली. या मूर्तीचे धड आणि मुंडके वेगळे करण्यात आलेले आहे. ही मूर्ती जवळपास दोन फुटांची असून जमिनीमध्ये आठ फूट खोल दबलेली होती.

याबाबत पुरातत्व विभागाने सांगितले की, येथे 16 शतकामध्ये बनवण्यात आलेल्या ‘दरिया खा’ स्मारकाचे खोदकाम सुरू असताना कामगारांना अचानक ही मूर्ती सापडली. ही मूर्ती वजनदार आहे. कामगारांनी याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यानंतर ही मूर्ती बाहेर काढण्यात आली. काळ्या दगडापासून बनवण्यात आलेली ही मूर्ती नृत्यमुद्रेमध्ये दिसत आहे. सध्याही मूर्ती भोपाळला अधिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे. येथे या मूर्तीबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मूर्ती 1 हजार वर्षापूर्वीची असावी आणि परकीय आक्रमणामध्ये ती भग्न करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इतिहासकारांचे काय आहे म्हणणे
प्रसिद्ध इतिहासकार विश्वनाथ तिवारी यांच्या मते ही मूर्ती नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत येथे राज्य करणारा परमार राजवंशाच्या काळातील नाही. परमार राजवंशाने मांडू किल्ली बनवला होता परंतु ते पंचमहातत्वापैकी आगीची पुजा करायचे आणि ते भगवान शंकराला आराध्यदैवत मानायचे. त्यामुळे या मूर्तीचा काळ त्यापेक्षा आधीचा असण्याची शक्यता आहे. 11 व्या शतकात चौलुक्य वंशाचे राजे श्रीकृष्णाची पुजा करायचे त्यामुळे ही मूर्ती त्याकाळातील असावी, असे विश्वनाथ तिवारी यांनी सांगितले.