देशभरात नोटाबंदीचे वर्षश्राद्ध अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे, काळा दिन

डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून महिला या 'जनआक्रोश' मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणाऱया नोटाबंदीचे वर्षश्राद्ध देशभरात घालण्यात आले. राजधानी दिल्ली, मुंबईसह सर्वत्र काळा दिन पाळण्यात आला. नोटाबंदीच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्यात आली, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपने जल्लोष करून नोटाबंदीचे फायदे सांगण्याची धडपड केली. दरम्यान, वर्षभरानंतरही अर्थव्यवस्था सुरळीत झालेली नाही. महागाई वाढतेच आहे. त्यामुळे नोटाबंदीचा लाभार्थी कोण, हा एकच सवाल जनता विचारत आहे. 8 नोव्हेंबर 2016 ला रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500, 1000 च्या नोटा चलनातून अचानक बाद करून नोटाबंदी जाहीर केली. गेल्या वर्षभरात नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था ढवळून निघाली. बाजारपेठांमध्ये आर्थिक मंदीचे सावट कायम राहिले. सामान्य जनता, कामगार, शेतकरी, लहान व्यापारी, लघु उद्योजक यांना मोठा फटका बसला. बुधवारी जनतेने उत्स्फूर्तपणे नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातल्याचे चित्र देशभरात पाहायला मिळाले. आंदोलने, मोर्चे, निर्देशनेही करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, तृणमुल काँग्रेससह विरोधकांनी नोटाबंदीचा काळादिन पाळला.

भाजपचा काळा पैसाविरोधी दिवस

भाजपने आज काळापैसा विरोधी दिवस साजरा केला. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये भाजपनेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रम घेतले. नोटाबंदीचे फायदे सांगण्याची चढाओढच भाजप नेत्यांमध्ये दिसत होती.

15 लाख लोकांच्या नोकऱयांवर कुऱहाड

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर पहिल्या चार महिन्यांतच देशभरात 15 लाख लोकांच्या नोकऱयांवर कुऱहाड कोसळल्याची माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीतून समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल 2017 या काळात 15 लाख लोकांचा रोजगार गेला. 2016 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या काळात देशातील 40 कोटी 65 लाख लोकांकडे रोजगार होता. मात्र, नोटाबंदीनंतर जानेवारी ते एप्रिल 2017 मध्ये रोजगार असलेल्यांची संख्या 40 कोटी 50 लाख इतकी कमी झाली असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

मित्रों… आज काही नाही!

आज नोटाबंदीच्या वर्षपूर्ती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा नोटाबंदी-दोनची घोषणा करतील, बेनामी संपत्तीबाबत निर्णय होईल अशी चर्चा दिवसभर होती. पण पंतप्रधान मोदी यांनी आज काही नवी घोषणा केली नाही.

125 कोटी हिंदुस्थानींनी निर्णायक युद्ध लढले आणि जिंकले. देशातून भ्रष्टाचार आणि काळापैसा संपवण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांना साथ दिली. जनतेचे मी आभार मानतो. जनतेपुढे मी नतमस्तक आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी

वेश्याव्यवसायाला आळा बसला

नोटाबंदीमुळे मुलींच्या तस्करीत घट झाली असून, वेश्याव्यवसायाला आळा बसला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि देशाच्या इतर भागांमधील मुलींची तस्करी व्हायची. रोख रकमेतून हे व्यवहार केले जायचे. मात्र, नोटाबंदीमुळे या व्यवहारांमध्ये घट झाली. तसेच नोटाबंदीमुळे सुपारी देऊन होणारे गुन्हे कमी झाले. कश्मीरातील दगडफेकीच्या घटना, नक्षलवादी कारवायाही घटल्या आहेत.
– रविशंकर प्रसाद, केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री

नोटाबंदी ही शोकांतिका

नोटाबंदी ही एक शोकांतिका आहे. पंतप्रधानांनी लाखो प्रामाणिक लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरच प्रहार केला. नोटाबंदीमुळे जीडीपी 2 टक्के घसरला. लाखो लोक बेरोजगार झाले. नोटाबंदी ही मनी लॉण्डरिंग स्कीम आहे. या हल्ल्यामुळे लोकांच्या मनात संताप खदखदत आहे. बेरोजगारीमुळे संतप्त झालेल्या लोकांच्या मनातील संतापाचे रुपांतर जातीय आणि धार्मिक तेढ वाढविण्यात होत असून, याला पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत.
– राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष

नोटाबंदीच्या माध्यमातून अनेक श्रीमंतांचा काळा पैसा पांढरा झाला. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या मुलाच्या संपत्तीत झालेली वाढ हेच नोटाबंदीचे खरे यश म्हणायला हवे.
– लालुप्रसाद यादव (राजद अध्यक्ष)

नोटाबंदीचा निर्णय नैतिक आणि राजकीयदृष्टय़ाही योग्यच होता. लेस कॅश म्हणजे काळ्या पैशाला लगाम हे नोटाबंदीचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
– अरुण जेटली, अर्थमंत्री

नोटाबंदीमुळे 15 लाखवर लोकांच्या नोकऱया गेल्या. हा दिवस लाखो लोकांना, लहान व्यापाऱयांना भोगावा लागलेल्या नाहक त्रास, वेदनेचा दिवस आहे.
– पी. चिदंबरम
(माजी अर्थमंत्री)

नोटाबंदी हाच मोठा घोटाळा आहे. नोटाबंदीचा फायदा भाजपला झाला. भाजपने काळा पैसा पांढरा केला. देशाच्या अर्थव्यवस्थेला मात्र मोठा फटका बसला आहे. याचे उत्तर देण्याऐवजी केंद्र सरकार फक्त भाषणे देत आहे. – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमुल काँग्रेस अध्यक्ष)

देशात आधीच बेरोजगारीचा मोठा प्रश्न होता. त्यातच नोटाबंदीचा फटका बसला. खुद केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून जुलै 2017 पर्यंत 30 लाख 67 हजार तरूणांनी प्रशिक्षण घेतले. मात्र, यातील केवळ 2 लाख 9 हजार तरूणांनाच रोजगार मिळाला आहे. सरकारी आकडेवारीतून हे समोर आले आहे.