व्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे स्थानकावरील लोकांचा जीव त्या वेळी भांड्यात पडला जेव्हा एक वर्षाची एक चिमुरडी रेल्वे ट्रॅकवर पडली. परंतु दैव बलवत्तर म्हणा म्हणून त्या चिमुरडीवरून ट्रेन जाऊन देखीलही नशिबाने तिच्या अंगाला साधं खरचटलं देखील नाही. हा सर्व प्रकार येथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मथुरा रेल्वे स्थानकावर रेल्वे येत असल्याची घोषणा झाल्यानंतर एक वर्षाची चिमुरडी खेळताखेळता प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर पडली. तिला उचलण्यासाठी जाणार इतक्यात रेल्वे वेगाने आली आणि निघून गेली. या दरम्यान प्लॅटफॉर्मवरील एकाचीही त्या चिमुरडीला वाचवण्याची हिंमत झाली नाही. वाऱ्याच्या वेगाने आलेली रेल्वे चिमुरडीवरून गेल्याने ती वाचण्याची शक्यता कमीच होती. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे ती चिमुरडी वाचली. तिच्या रडण्याच्या आवाजाने सर्वांना ती ठिक असल्याचे लक्षात आले आणि एकाने ट्रॅकवर उतरत त्या चिमुरडीला उचलले व तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. यामुळे एका क्षणात गंभीर वातावरण आनंदाचे झाले.