कोटींच्या नोकरीचे आश्वासन लाखांवर भागवलं, माजी पंतप्रधानांचा मोदींवर निशाणा


सामना ऑनलाईन । नवी मुंबई

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केल आहे. अर्थव्यवस्था, दहशतवाद, परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवरून मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देशातील तरुणांना दिलं होतं, मात्र हे सरकार दोन लाख लोकांनाही नोकऱ्या देऊ शकलेलं नाही.

काँगेसचं ८४वं महाअधिवेशन दिल्लीत सुरू आहे. रविवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मनमोहन सिंग बोलत होते. नोटाबंदी आणि जीएसटीची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले. मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यासाठी देशाचा विकास दर कमीत कमी १२ टक्के होणे गरजेचे आहे, ज्याची कल्पनाही केली जावू शकते नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही घोषणा देखील ‘जुमला’ असल्याचं हळूहळू स्पष्ट होत आहे, असं मनमोहन सिंग म्हणाले.

जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, जम्मू कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे मात्र तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. जम्मू कश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार फेल झालं आहे. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या अपयशाचा पाढा सर्वांसमोर वाचला.