राजस्थानातील ‘या’ मंदिरात दाखवतात कांद्याचा नैवेद्य

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानातील चुरु जिल्ह्यात ददरेवा धाम येथील गोगाजी आणि गुरु गोरखनाथ मंदिरात नैवेद्य म्हणून देवाला कांदे अर्पण करण्याची प्रथा आहे. देवाला कांदे अर्पण करण्याची येथील अनेक वर्षांपासून प्रथा आहे. सध्या या देवस्थानात महिनाभर जत्रा सुरू असून मंदिरात कांद्याच्या राशी जमल्या आहेत. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापासून येथे महिन्याभर चालणारी जत्रा भरते. या जत्रेत सुमारे चार ते पाच लाख भाविक येतात. त्यांच्याकडून देवाला कांदे अर्पण करण्यात येत असल्याने या काळात सुमारे ५० ते ६० क्विंटल कांदे मंदिरात जमा होतात.

देवाला कांदे अर्पण करण्यामागे स्थानिकांकडून एक आख्यायिका सांगण्यात येते. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी हनुमानगडमधील गोगामेडीजवळ महमद गजनवी आणि गोगाजी यांच्याच युद्ध झाले होते. तेव्हा गोगाजी यांनी देशातील विविध भागातून सैन्याला बोलावले होते. येथे आलेले सैनिक आपल्यासोबत कांदे आणि डाळ घेऊन आले होते. या युद्धादरम्यान कांद्याच्या रसदेमुळे सैनिकांना मोठा आधार मिळाला होता. कांद्याचे अनेक वैद्यकीय फायदेही आहेत. तसेच कांदा स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यानेही देवाला कांदा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

गोगाजी यांचे जन्मस्थळ असलेल्या ददरेवामध्ये त्यांचा महालही होता. तेथे त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गुरु गोरक्षनाथ मंदिरात गेल्यावर भाविकांची यात्रा पूर्ण होते. गोरख गंगेत स्थान करून भाविक दोन्ही मंदिरात कांद्याचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.