कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

1

सामना प्रतिनिधी । राहुरी 

चार दिवसात क्विंटल मागे चारशे रुपये दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतक-यांची मोठी निराशा झाली. राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर आज १ नंबर कांद्याला १००० ते १२५० रूपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. दिपावली सणानिमित्ताने ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार मितीतील कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. ३ नोव्हेंबरला राहुरी बाजार समितीशी संलग्न असलेल्या वांबोरी उपबाजार समिती मध्ये १ नंबर कांद्याचे बाजारभाव ११५० ते १८०० रूपये क्विंटल पर्यंत जाऊन पोहोचले होते.

दरम्यान गुरूवारी  पाडव्याच्या मुहूर्तावर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर  कांद्याचे लिलाव झाले. आज मोंढ्यावर ८ हजार ९९३ गोणी कांद्याची आवक झाली होती. चार दिवस मोंढा बंद असल्याने आज गुरूवारी कांद्याचे बाजारभाव वाढतील ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.मात्र क्विंटल मागे चारशे रुपये बाजारभाव घटल्याने शेतक-यांच्या वाट्याला निराशा आली.

गुरूवारी मोंढ्यावर विक्रीसाठी दाखल झालेल्या दोन नंबर कांद्याला ५५० ते ९९० रूपये, तीन नंबर कांद्याला १०० ते ४९० रूपये, गोलटी कांद्याला ४०० ते ७०० रूपये क्विंटलचा  बाजारभाव मिळाला. १ नंबरच्या ३२७ गोणी कांद्याला १२५० रूपये तर १२०० रूपयाच्या भावाने ८९१ गोणी कांद्याचे लिलाव झाले. आज मोंढ्यावर ८ हजार ९९३ गोणी कांद्याची आवक झाली होती. मात्र ३२०० गोणी कांद्याला १०५० ते १२५० रूपये क्विंटल पर्यंत भाव मिळाला. तर ५ हजार ६७५ गोणी कांद्याची १०० ते ७०० रूपये क्विंटल बाजारभावाने विक्री झाली.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर १५ गोणी कांद्याला १५०० रूपये, ६६ गोणी कांद्याला १४०० रूपये, २७ गोणी कांद्याला १३५० रूपये, तर १०७ गोणी कांद्याला १३०० रूपये क्विंटल हा अपवादात्मक बाजारभाव मिळाला.