कांदा पुन्हा तेजीत

सामना प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर पुन्हा जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला आज प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांहून अधिक भाव मिळाला. लाल कांदाही सरासरी दोन हजार रुपयांच्या घरात पोहोचल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

परतीच्या पावसाने इतर राज्यांमधील कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांद्याची मागणी वाढली होती. मात्र, शासनाने व्यापाऱ्यांना साठेबाजी करू नका, असे बजावल्याने दर खालावले होते. आता उन्हाळ कांद्याची आवक कमी होऊ लागल्याने दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. पिंपळगाव बाजार समितीत आज या कांद्याला कमाल ३५०० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी २८५१ रुपये दर मिळाला, तेथे आवक १२ हजार ७६० क्विंटल होती.

लासलगावला कमाल ३३५१, सरासरी २९६० रुपये दर मिळाला, तेथे आवक १२ हजार क्विंटल होती. उमराणे बाजार समितीत आवक १४ हजार ५०० क्विंटल होती, दर कमाल ३१३२, सरासरी २६०० रुपये होता.

देवळा समितीत ७५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली, दर कमाल ३०७०, सरासरी २९०० रुपये होता. नामपूरला कांद्याला कमाल ३३००, तर सरासरी २९०० रुपये दर मिळाला, येथे आवक आठ हजार क्विंटल होती.

लाल कांदाही वधारला
लाल कांद्याची आवकही वाढली आहे, त्याला सरासरी १७०० ते २५०० रुपयांच्या घरात दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बाजार समित्यांमधील लाल कांद्याचे किमान, कमाल, सरासरी दर प्रतिक्विंटलमध्ये व कंसात आवक पुढीलप्रमाणे : लासलगाव – १५००-३०००-२५०० (२०००), पिंपळगाव – १२००-३०३१-२४५१ (१६७०), उमराणे – १०००-३०००-२२०० (४५००), सिन्नर – २००-२७४३३ -२००० (९४५), देवळा – १०००-२५९०-२१००(१५००), नामपूर – ९००-२८५०-२१०० (२५००), नांदगाव – ७००-२९०१-१७०० (७००).