माझा छंद जगण्याची नवी उमेद देतो

>>ओंकार बांगर, वरळी

छंद माणसाला जगायला शिकवतात हे खरंचमलाही माझा छंद जगण्याची नवी उमेद देतो. रुईया महाविद्यालयातून नुकतेच मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून सध्या यूपीएससीची तयारी करतोय.

शाळेत नववीला असताना मला कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली. खरं तर याचे सारं श्रेय आमच्या ढवळे मॅडमना जातं. त्या आम्हाला मराठी शिकवायला होत्या. तो विषय त्या खूप छान शिकवायच्या. एखादा धडा शिकवताना त्याचे अनेक संदर्भ, माहिती द्यायच्या. त्यामुळे तो विषय जास्त आवडायचा. नववीतच एक धडा मला फार आवडला आणि त्यावरून एक कविता सुचली. जे डोक्यात आले ते वहीवर उतरवले. ती पहिली कविता म्हणजे ‘मी माणूस होईन’. मी लिहिलेली पहिली कविता ढवळे मॅमना दाखवली त्यांना ती फार आवडली. त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केलेच, पण स्टाफ रूममध्ये इतर शिक्षकांना दाखवली. सगळ्यांनी त्या कवितेची प्रशंसा केली. त्यांची ही प्रशंसा माझ्यासाठी कौतुकाची थापच होती. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर हिंदी, इंग्रजी भाषेत कविता करायला लागलो.

केवळ हौसेसाठी

आतापर्यंत मी बऱयाच दोन ओळी, चारोळ्या, कविता लिहीत आलो आहे. मराठी, हिंदी अणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लिहीत असल्याने शंभरच्या वर मी कविता लिहिल्या आहेत. पण माझं हे लिखाण केवळ माझ्यासाठी विरंगुळा आहे. माझे अनुभव माझ्या लिखाणातून बहरतात. आवड म्हणून लिहितो आणि सोशल साईटवर पोस्ट करतो. पण सध्या यूपीएससीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे.

मित्र-मैत्रिणींसोबत हिंदी बोलणे जास्त व्हायचे. मग उर्दूत लिहिण्याची इच्छा झाली आणि तोही प्रयत्न करायला लागलो. मग मी लिहिताना जास्तीत जास्त उर्दूचा वापर करायला लागलो. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना आपण फार अल्लड असतो. पण जसजसे कळायला लागलं तसा कविता, चारोळ्या, दोन ओळी यामध्ये प्रगल्भता यायला लागली. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो लिखाणातही उतरला. त्यानंतर लिहिण्यात नावीन्य आणण्यासाठी फेसबुकवर रेखता फाऊंडेशनच्या पेजला फॉलो करायला लागलो. त्या पेजवर एक नवीन शब्द आणि अर्थ पोस्ट केला जातो. त्यानुसार कविता करून छंद जोपासतो. माझे आई-बाबा हे माझ्या कवितांचे पहिले वाचक असतात, बाबांनी तर सांगितलेय अभ्यास चांगला कर पण तुझ्यातले हे कौशल्य तसेच जपून ठेव.

वेगळ्या वाटेवरचे छंद तरुणाईला नेहमीच खुणावतात. आपला अभ्यास सांभाळून निवडलेली वेगळी वाट आम्हालाही सांगाछायाचित्रासहित.

आमचा पत्ता ः Gen Next, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामनामार्ग, प्रभादेवी, मुंबई-25 [email protected] वरही पाठवता येईल.‘