तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची

सामना प्रतिनिधी । धुळे

तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी होईल, पण तत्पूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. दोन हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडून बारा क्विंटल तुरीची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती खरेदी-विक्री संघातर्फे देण्यात आली. तूर विकणाऱ्या शेतकऱ्याने आधार कार्ड, सात-बारा आणि तूर लागवडीचा उल्लेख अपलोड करायचा आहे. त्यानंतर तूर खरेदीचे वेळापत्रक निश्चित करून शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी होणार आहे.

राज्य सरकारने हमीभाव जाहीर करीत शासनाच्या केंद्रावर तूर खरेदी करण्याचे धोर अवलंबले आहे. त्यासाठीचे आदेश पारीत केले, पण प्रत्यक्षात अद्याप तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नावे नोंदविली जात आहेत. नाव नोंदविताना शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, तूर लागवडीचा उल्लेख असलेला सात-बारा उतारा, बँक पासबुकाची झेरॉक्स खरेदी-विक्री संघाकडे देऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर गटागटाने तुरीची खरेदी होईल.

उर्वरित तूर कुठे विकणार
उत्कृष्ट व्यवस्थापन करून शेतकरी दोन हेक्टरमध्ये बारा क्विंटलपेक्षा जास्त तूर पिकवितो. हमीभाव केंद्रावर केवळ बारा क्विंटल तूर खरेदी होणार असेल तर उर्वरीत तुरीच्या विक्रीचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.