सणासुदीत 40 टक्के हिंदुस्थानींची फसवणूक

बहुतेक जण सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगला पसंती देतात, मात्र ऑनलाइन शॉपिंग करणे अनेकांना महागात पडले आहे. एका सर्वेक्षणानुसार, सणासुदीच्या काळात 40 टक्के हिंदुस्थानींनी आपली ऑनलाइन शॉपिंगदरम्यान फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

सणासुदीच्या काळातील ऑनलाइन खरेदी आणि सायबर सुरक्षेसंदर्भातील दृष्टिकोन या मुद्दय़ांचा अभ्यास करण्यासाठी नॉर्टन लाइफलॉकच्या वतीने द हॅरिस पोल या संस्थेने सर्वेक्षण केले होते. यात हिंदुस्थानातील 18 वर्षांवरील 1001 व्यक्तींचा समावेश होता. अहवालानुसार, सर्वेक्षणात सहभागी दर पाचपैकी चार प्रौढांनी सांगितले की, सणासुदीत त्यांनी विविध मार्गांनी आपली वैयक्तिक माहिती धोक्यात टाकली. अनेक जण बऱ्याचदा सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबीयांसाठी, मित्रमंडळींसाठी भेटवस्तू खरेदी करतात. यंदाच्या सणासुदीच्या काळात हिंदुस्थानींनी स्मार्टपह्न्स (64 टक्के), स्मार्टवॉच (55 टक्के) आणि स्मार्ट होम डिव्हाइसेसला (47 टक्के) पसंती दिल्याचे आढळले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 8 टक्क्यांनी कमी आहे. राहणीमानाचा वाढता खर्च आणि महागाई ही यामागची कारणे आहेत, असे अहवालात म्हटलेय.