परीक्षा ‘नीट’ होणार नाही

1
exam
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन,मुंबई

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात 7 मे रोजी होणारी ‘नीट’ची परीक्षा (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) महाराष्ट्रात ‘नीट’ होण्याची गॅरंटी नाही. राज्याच्या कानाकोपऱयातून या परीक्षेसाठी 2 लाख 74 हजार विद्यार्थी बसले आहेत. पण या विद्यार्थ्यांसाठी फक्त सहाच परीक्षा केंद्रे मंजूर झाली आहेत.

यंदा प्रथमच होणाऱया ‘नीट’च्या परीक्षेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर ही सहाच परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 7 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत ही परीक्षा होणार असून परीक्षा केंद्र गाठताना विद्यार्थ्यांना कसरतच करावी लागणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी मुंबई किंवा ठाणे गाठावे लागणार आहे. तर विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर हे एकमेव परीक्षा केंद्र उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ प्रवासातच जाणार आहे. यामुळे ‘नीट’मध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

नीटसाठी अर्ज करण्याची मुदत 1 मार्चपर्यंत आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी 2017 पासून नीटअनिवार्य करण्यात आली असून विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीच्या संयुक्त अभ्यासक्रमावर आधारित 180 प्रश्न या परीक्षेत सोडवायचे आहेत. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला आहे.