चहा पोळीची न्याहारी… किती पौष्टिक?

>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ज्ञ

सकाळची धावपळीची वेळ. वेळेत कामाचे ठिकाण गाठण्याची लगबग. स्वतःचे, घरातील आवरून ट्रेन, बस गाठून कामाला पोहोचणेया गडबडीत न्याहारीकडे बर्‍याच जणांचे दुर्लक्ष होते. पण भूक तर लागलेली असते. वर्षानुवर्षे चालत आलेली लोकप्रिय न्याहारी म्हणजे चहापोळी. दुपारच्या जेवणासाठी सकाळी अनायसे घरात पोळ्या होत असतातकिंवा रात्रीची उरलेली पोळीही चहासोबत सहज खाल्ली जाते. पण सतत चहा पोळीने दिवसाची सुरुवात कितपत योग्य…?  

दिवसभरासाठी  लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी नियमित न्याहारी करणे आवश्यक आहे. न्याहारीत सर्व महत्त्वाचे घटक सामावले पाहिजेत. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे व खनिजे न्याहारीतून मिळवणे गरजेचे असते. पण आजकालच्या घाईघाईच्या आयुष्यात घरी न्याहारीसाठी ताजे व पौष्टिक खाणे बनवणे अनेकांना जमत नाही. मग अनेकजण केवळ झटपट रेडी टू ईट पदार्थ किंवा चहा-पोळीसारखे सोपे पदार्थ खातात.

चहा-पोळी या आहारात अपुरे पोषण आहे. पोळीमध्ये मुबलक कर्बोदके व थोडी प्रथिने आहेत. चहामध्ये अधिक प्रमाणात कॅफीन असल्याने सकाळी रिकाम्यापोटी चहा पिणे योग्य नाही. सकाळी रिकाम्यापोटी शरीराला आवश्यक ऊर्जा व इतर घटकांची गरज असते. पण चहाबरोबर पोळी खाल्ल्याने पोळीतील कॅल्शियम व लोह शरीरात मिसळू देत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. यातून शरीराला फक्त ऊर्जा व कर्बोदके मिळतात, पण न्याहारी म्हणून हा आहार योग्य नाही.

जरी चहा-पोळी नाश्त्याला योग्य पर्याय नसला तरी अनेकजणांना सकाळी उठल्यावर चहा व बिस्किट खायची सवय असते. वजन वाढू नये म्हणून अनेकजण चहासोबत हेल्दी बिस्किट, हाय फायबर बिस्किटे व साधे टोस्ट याचे पर्याय शोधतात, पण रात्रीच्या उपवासानंतर सकाळी उठल्यावर चहा-बिस्किट किंवा टोस्ट खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळत नाही. त्याचबरोबर चहातील कॅफिनमुळे ऑसिडीटीचा त्रास होऊ शकतो. बिस्किटे व टोस्ट यांमध्ये मिठाचे व साखरेचे प्रमाण अधिक असल्याने ते घातक असतात. त्यामुळे सकाळी चहा-टोस्ट किंवा चहा-बिस्कीट खाणे टाळले पाहिजे. एखादे फळ खाऊन किंवा मूठभर सुका मेवा व पाणी घेऊन दिवसाची सुरुवात करणे योग्य.

चहा पोळीसोबत न घेता थोड्या वेळानंतर घेणे योग्य ठरते. यामुळे पोळीतील योग्य पोषक तत्त्वे शरीराला मिळतात व पोळीच्या बरोबर वरील पर्याय खाल्ल्याने शरीराला पोषक आहार मिळतो व न्याहारीमधून योग्य व पुरेसे घटक शरीराला मिळतात. पोळीचा समावेश न्याहारी आणि चहा-पोळी म्हणून न करता झटपट रोल बनवून केला तर तो शरीरासाठी उपयुक्त ठरतो व पौष्टिक न्याहारी केल्यामुळे शरीरात दिवसभर उत्साह व फूर्ती टिकून राहते. 

काही पोळीसोबत न्याहारीचे पर्याय

l पोळी व अंड्याचा रोल

l गूळ-तूप पोळीचा रोल

l पोळी व सुक्या भाजीचा रोल

l फोडणीची पोळी

l तूप-साखर घालून पोळीचा लाडू

l पनीर बुर्जीचा पोळी रोल