राज्यात उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना ५०० रुपये दंड

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रात आता कुठेही उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक शौचालये असतानाही उघड्यावर शौचाला बसल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून ५०० रु. दंड वसूल केला जाणार आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या नियमावलीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सरकारने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थूंकणे, लघुशंका करणे यासारख्या गोष्टीवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शहर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, सरकारने कचरा व्यवस्थापन कायदा २०१६ ची महानगरपालिका आणि नगर परिषद परिक्षेत्रात तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राज्यातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील महापालिकांसाठी दंडात्मक कारावाईची रक्कम एकच ठेवण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार एखादी व्यक्ती किंवा संस्था कचरा फेकून आजूबाजूचा परिसर कचरा फेकून किंवा मग इतर काही कारणाने अस्वच्छ करत असेल तर त्या व्यक्तींकडून १५० ते १८० रुपये दंड वसूल केला जाईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्या व्यक्तींकडूनही १०० ते १५० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्याकडून १०० ते २०० रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे. तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तींकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.