परभणीत विजेचे उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरासह जिल्हाभरात विजेच्या उघड्या रोहित्रांमुळे(डीपी) होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच बहुतांश भागांमध्ये जीर्ण झालेले खांब आणि लोंबकाळणाऱ्या विजेच्या तारांमुळे जीवघेणे अपघात घडत आहेत. वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात वारंवार तक्रारी देऊनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून जिवीत होनी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परभणी शहरातील विशेषत: पाथरी रोड, जिंतूर रोड, वसमत रोड या मुख्य रस्त्यालगत असलेल्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात लोंबकाळणाऱ्या तारा दिसून येत आहेत. तसेच या भागातील विद्युत रोहित्र देखील उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. रोहित्रांच्या परिसरामध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने या भागात चरण्यासाठी आलेल्या जनावरांना विजेचा धक्का लागून बळी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच शहरातील फ्युज कॉल सेंटर अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले असून नागरिकांनी तक्रारीसाठी फोन केल्यावर प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यावर नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या सर्व बाबीकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देऊन नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.