सेल्फी विथ खड्डा आणि ट्विटरवर टीकेचा अड्डा

सामना ऑनलाईन, मुंबई

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ रस्त्यांची दूरवस्था दाखवण्यासाठी खड्ड्यासोबत सेल्फी काढला आणि तो ट्विटरवर अपलोड केला.

त्यांच्या या ट्विटवर लोकांनी त्यांनाच उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केली. फोटोवरील बहुतांश प्रतिक्रियांमधून धनंजय मुंडे यांना हाच प्रश्न विचारण्यात आला की गेली १५ वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही काय केलंत ?

राज्यातील रस्त्यांची अवस्था सध्या प्रचंड खराब आहे. ती दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सेल्फी विथ खड्डा हे ट्विटरवर आंदोलन सुरु केलं आहे. जनतेमध्येही खराब रस्त्यांमुळे प्रचंड संताप आहे. १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे, मात्र खराब रस्त्यांची संख्या पाहता या डेडलाईनपर्यंत काम पूर्ण होणं अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे.