चंद्रबाबूंच्या उपोषणात विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

1
chandrababu-naidu

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी तेलगू देसमचे प्रमुख आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत हैदराबाद भवनमध्ये उपोषण सुरू केले. त्यांच्या या उपोषणाला जवळपास सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आंध्र भवन हे विरोधी पक्षांच्या ऐक्याचे स्थळ बनल्याचे आज देशाला पाहायला मिळाले.

येथील राजघाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी सकाळी 8पासून आपले ऐतिहासिक उपोषण सुरू केले. या उपोषणात नायडू यांचे अख्खे मंत्रिमंडळ, तेलगू देसमचे खासदार, आमदार आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधीही बसले आहेत. या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकचे तिरुची शिवा, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, काँग्रेस नेते आनंद शर्मा, अहमद पटेल, जयराम रमेश आदी विरोधी पक्षनेत्यांनी नायडू यांच्या या उपोषणास उघडपणे पाठिंबा दिला.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्या मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेणार आहेत. ‘आंध्र’ला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीस या भेटीत त्या त्यांना समर्थन देणार आहेत. तसेच चंद्राबाबू नायडू हे उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या मागणीचे एक निवेदनही सादर करणार आहेत. यामुळे दुसरा दिवसही आंध्रास विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीने गाजणार आहे. दरम्यान, गुजरातमध्ये ‘राजधर्म’ पाळला गेला नव्हता आणि आजही आंध्रच्या बाबतीत तो पाळला गेला नाही, अशी तोफ चंद्राबाबू यांनी उपोषणाला बसल्यानंतर मोदी सरकारवर डागली.