सरकार आहे की नाटक कंपनी, मुख्यमंत्र्यांच्या चित्रफितीवरून सभागृहात गोंधळ

सामना प्रतिनिधी । मुंबई

पर्यावरणाविषयी संदेश देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सपत्नीक ध्वनिचित्रफितीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांच्यासह पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त गातात, नाचतात. अरे हे सरकार आहे का नाटक कंपनी, असा सवाल करीत भाजपचे नाव बदलून बेंजो पार्टी असे द्यावे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्याने सभागृहात एकच गोंधळ झाला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना विखे-पाटील यांनी सरकारवर जोरदार आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या बहुचर्चित चित्रफितीविषयी बोलताना ते म्हणाले की, राज्यात अनेक प्रश्न पडलेले असताना मुख्यमंत्री त्याच्याकडे दुर्लक्ष करून एखाद्या चित्रफितीमध्ये नाचतात. अर्थमंत्री त्यांच्यासोबत नाचतात. अर्थमंत्री मुनगंटीकार हे आमचे चांगले मित्र आहेत. या चित्रफितीत ते एका खडकावर उभे राहून गाणे गातात. आपल्याला चांगले माहीत की आहे खडक हे बऱ्याचदा निसरडे असतात. जर अर्थमंत्री त्या खडकाकरून घसरले असते तर अर्थसंकल्प कुणी मांडला असता, असा आम्हाला प्रश्न पडला आहे, अशी कोपरखळी विखे-पाटील यांनी मारली.

भाजपचे सदस्य भडकले
मुख्यमंत्र्यांनीही चित्रफितीत चांगला अभिनय केला आहे. ते कुलदीप पवार यांच्यासारखे दिसतात असे विखे-पाटील म्हणताच भाजप आमदार संजय कुटे आणि आमदार मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुख्यमंत्री हे या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी संयमित भाषा कापरायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी ती चित्रफीत काढली. त्यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे, असे संजय कुटे म्हणाले. याच वेळीं या चित्रफितीत अभिनेत्री कोण होती, असा सवाल विरोधी बाकांवरून केला. तेव्हा कुटे आणि मनीषा चौधरी अधिकच चिडले. तुमच्याकडचे लोक नेमके कुठे जातात आणि काय करतात ते सर्व मला माहीत आहे. मी ते सभागृहात सांगू का, असे कुटे म्हणाले.

नदी शुद्धीकरणाची ध्वनिचित्रफीत सरकारची नाही
मुंबईतील नदी शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत ही शासनाने किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाने तयार केलेली नाही. नदी शुद्धीकरण क्षेत्रात काम करणाऱया रिव्हर मार्च या अशासकीय संस्थेने ती तयार केली आहे. त्याचा शासनाशी कोणताही संबंध नाही असा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.