पुढची दहा वर्षे विरोधकांना सत्ता मिळणार नाही – मुख्यमंत्री

सामना प्रतिनिधी । कर्जत

विरोधकांची अवस्था पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. गेली पंधरा वर्षे सत्तेवर बसून डल्ला मारणारे आता हल्लाबोल यात्रा काढत फिरत आहेत. त्यांनी अशा आंदोलनाची प्रॅक्टीस करून घ्यावी. कारण विरोधकांना पुढची किमान दहा ते पंधरा वर्षे सत्ता मिळणार नसल्याने रस्त्यावर उतरून त्यांना हेच काम करायचे आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.

कर्जत येथील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, जनतेने आम्हाला सेवा करण्यासाठी सत्तेवर बसवले आहे. आम्ही सत्ता भोगणार नाही तर राबवणार आहोत. यापूर्वी सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने गेली पंधरा वर्षे फक्त पापे केली आहेत. विकासकामे राहिली बाजूला, जनतेला फक्त लुटण्याचे काम केले. त्याचे भोग त्यांना भोगावेच लागतील. त्यांना कायमस्वरूपी घरी बसविण्यासाठी आम्ही परिवर्तन घडवून आणूच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

… आणि गाजरांचा पेटारा उघडला
लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भाषण करतानाच मुख्यमंत्र्यांनी कर्जतकरांसाठी आश्वासनांच्या गाजराचा पेटाराही उघडला. कर्जत-पनवेल रेल्वे लवकर सुरू करू, घोटाळय़ांमुळे बुडालेल्या पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना त्यांचे पैसे मिळवून देऊ, नदीजोड प्रकल्प सुरू करू, एमएमआरडीएतून कर्जतला विशेष निधी देऊ असे एकापाठोपाठ एक घोषणांचे बारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उडवून दिले.