खासदार संजय काकडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सामना प्रतिनिधी । पुणे

काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी तसेच या कंपनीचे संचालक, बांधकाम व्यावसायिक व खासदार संजय काकडे, त्यांचे बंधू सूर्यकांत काकडे तसेच इतर संचालकांवर न्यू कोपरे गावच्या रहिवाशांची जमीन बळकावून त्यांची फसवणूक झाल्याचे सकृत्दर्शनी दिसत असल्याने या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांच्या न्यायालयाने दिले आहेत.

चूक दुरुस्तीपत्राच्या माध्यमातून कागदपत्रांत खाडाखोड करून गावकऱ्यांची फसवणूक झाल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त करून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास करावा असे या आदेशात म्हटले आहे. न्यू कोपरे ग्रामस्थांनी १४ एकर जमीन सूर्यकांत काकडे यांना विकसनासाठी दिली होती, मात्र कागदपत्रांत खाडाखोड करून एकूण ३८ एकर जमीन घेण्यात आली. त्यातील सात एकर जमीन महापालिकेला ‘ऑमिनिटी स्पेस’ म्हणून देण्यात आली. उर्वरित १७ एकर गावकऱ्यांच्या मालकीची जमीन बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.