‘ट्रिपल तलाक’वर फैसला घटनापीठ देणार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली – मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीकत्व या प्रथांच्या बाबतीत दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी पाच सदस्यांचे ‘घटनापीठ’ स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

ट्रिपल तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीकत्वाचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापासून पळ काढता येणार नाही असे मत सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अधिपत्याखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाने आज व्यक्त केले.

या प्रकरणात शनिवारी आणि रविवारीसुद्धा सुनावणी घेण्यास न्यायालयाची तयारी आहे, असेही पुढे नमूद केले. त्या खंडपीठात न्यायमूर्ती एन. व्ही. रामना आणि न्यायमूर्ती डी. व्ही. चंद्रचूड यांचा समावेश आहे.

वरील तीन मुद्दय़ांवर पक्षकारांनी उपस्थित केलेल्या साऱया प्रश्नांची नोंद घेतानाच ते सारे प्रश्न येत्या ३० मार्च रोजी पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे ठेवले जातील असे सरन्यायाधीश खेहर यांनी सांगितले.

मुस्लिम समाजातील संबंधित प्रथांबद्दल केंद्र सरकारने उपस्थित केलेले काही कायदेविषयक मुद्दे हे घटनात्मक बाबींशी संबंधित आहेत. त्यामुळे ते मुद्दे हाताळण्यासाठी पूर्ण पीठाचीच गरज आहे असे तीन सदस्यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

या प्रकरणात पक्षकारांनी आपले म्हणणे १५ पानांच्या मर्यादेत पुढील सुनावणीच्या आधी मांडावे. तसेच आपल्या मुद्दय़ांचा आधार असलेल्या कायद्याची जंत्रीही पक्षकारांनी द्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले.

शाहबानो प्रकरणाची पुनरावृत्ती घडेल काय?

सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात या आधी दिलेल्या निकालाचे नंतर काय झाले याची एका वकील महिलेने आजच्या सुनावणीवेळी आठवण करून दिली. त्यावर खंडपीठ म्हणाले की, प्रत्येक खटल्याला दोन बाजू असतात. आम्ही गेली 40 वर्षे न्यायनिवाडे करत आलो आहोत. आम्हाला सारे काही कायद्यानुसारच करावे लागते आणि कायद्याबाहेर जाऊन काहीच करता येत नाही.