रुग्णाच्या नातेवाईकांकडे लाच मागणारा ओटी अटेंडंट ट्रॅप

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

शस्त्रक्रियेसाठी वापरात न आलेले धाग्यांचे तीन बंडल रुग्णाच्या नातेवाईकांना परत करून ते मेडिकल दुकानात विकण्यास सांगितले. पण ते बंडल परत केल्यानंतर मिळणाऱ्या पैशातील एक हजाराची मागणी करून त्यापैकी ७५० रुपये घेताना कूपर रुग्णालयाच्या ओटी अटेंडंटला एसीबीने रंगेहाथ पकडले. दत्तात्रय भोंडवे (३५) असे त्याचे नाव आहे. दिनेश (नाव बदललेले) यांच्या आईवर कूपर रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया झाली.

या शस्त्रक्रियेसाठी मेडिकल दुकानातून दिनेश यांना शस्त्रक्रिया धाग्यांची चार बंडले आणण्यास सांगितले होते. मात्र त्या धाग्यांचा काहीच वापर झाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी एक बंडल परत देऊन ते मेडिकल दुकानात परत देऊन पैसे स्वतःकडे ठेवण्यास सांगितले. मात्र त्यानंतर दत्तात्रय भोंडवे याने उर्वरित तीन बंडल दिनेश यांना परत देऊन तेही मेडिकल दुकानात परत देऊन पैसे घेण्यास सांगितले. पण मिळणाऱ्या पैशातील एक हजारची मागणी भोंडवे याने केली. मात्र लाच द्यायची नसल्याने दिनेशने एसीबीकडे तक्रार दिली.