नियतीने दुरावलेले भाऊ-बहीण एकत्र येणार, दादरमध्ये होणार अनोखे रक्षाबंधन

सामना ऑनलाईन । मुंबई

आज घराघरात भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनचा सण साजरा होणार असला तरी दादरमध्ये एक अनोखे रक्षाबंधन पार पडणार आहे. नियतीमुळे ज्यांना लहानपणीच एकमेकांपासून लांब केले अशा सख्ख्या बहीण-भावाची आज खूप वर्षांनी भेट होणार आहे. मुंबई आणि जवळच्या अनाथाश्रमांत राहणारी ही मुले वर्षानुवर्षे आपल्या सख्ख्या भावंडांना भेटू शकत नाहीत. आपला भाऊ किंवा बहीण या आश्रमात राहते एवढीच त्यांना माहिती असते. ‘अवर चिल्ड्रन’ या संस्थेने सर्व अनाथाश्रमांमधील डाटा तपासून अशा अडीचशे मुलांना एकत्र आणून त्यांचे आज रक्षाबंधन साजरे करण्याचे ठरवले आहे.

चार भिंतींत आपण सुखी आयुष्य जगत असतो तेव्हा या समाजात अशी अनेक मुले आहेत ज्यांच्या नशिबी नियतीने फक्त फरफटच लिहून ठेवलेली असते. वडिलांनी आईचा खून केलेला असतो आणि वडील तुरुंगात असतात. मग त्यांच्या मुलांची रवानगी अनाथाश्रमात! पण इथेही भाऊ मुलांच्या आश्रमात आणि बहीण मुलींसाठीच्या आश्रमात! सख्खी भावंडे असूनही त्यांची ताटातूट होते. अशी असंख्य मुले मुंबई आणि जवळच्या अनाथाश्रमांत आपल्या माणसांपासून दुरावलेली आहेत. प्रेमाचा ओलावा, बहीण-भावांमधली भांडणे या सार्‍या आठवणींना मुकलेली ही मुले 18 वर्षांपर्यंत आपल्या मनात बहिणीचे किंवा भावाचे आणि त्याच्या अनाथाश्रमाचे नाव जपत जगत असतात. आजवर या भावा-बहिणींना एकत्र आणण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून कधीच झालेले नाहीत, पण ‘अवर चिल्ड्रन’ या संस्थेने मुंबई आणि जवळच्या 50 अनाथाश्रमांतील 230 मुलांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. यावेळी तब्बल 190 भाऊ -बहिणी रक्षाबंधन साजरे करणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने पराग म्हात्रे यांनी दिली.

दादर पूर्वेकडील राजा शिवाजी विद्यालयासमोरच्या ‘द बॉम्बे आंध्र महासभा आणि जिमखाना’ येथे रविवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत हा पहिलावहिला रक्षाबंधन सोहळा आयोजित केला जात असल्याची माहिती संस्थेचे धनंजय मेहता यांनी दिली. अनाथाश्रमांतील मुलांसाठी ही संस्था काम करते. कोणाचे आईवडील नाहीत तर कोणाची आई आहे पण वडील नाहीत. पण मुलांना सांभाळू शकत नाही म्हणून अनाथाश्रमात ठेवलेले असते, तर कधी आईवडील गेलेल्या मुलांपैकी मुलगा नातेवाईकांकडे राहत असतो, पण मुलीची जबाबदारी नको म्हणून तिला अनाथाश्रमात ठेवलेले असते. अनेक प्रकरणांमध्ये भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणीसुद्धा वेगवेगळ्या आश्रमात राहतात. अशी सगळी भावंडे अनेक वर्षांनी या कार्यक्रमात भेटणार आहेत.

या मुलांसाठी आम्ही दरवर्षी पिकनिक आयोजित करतो. या पिकनिकदरम्यान मुस्लिम कुटुंबातील ताटातूट झालेली भावंडे अचानक एकमेकांच्या समोर आली आणि त्यांनी एकमेकांना ओळखले आणि ती अक्षरशः बांध फुटल्यागत रडू लागली. हा प्रसंग पाहून आमचे काळीज गलबलले आणि तेव्हाच असा कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवले अशी माहिती संस्थेचे गिरीश यांनी दिली. कधी तरी कोर्टात योगायोगाने अशी भावंडे एकत्र आली तर त्यातल्या बहिणी आपल्या भावाला अक्षरशः सोडत नाहीत.