‘ओवी’ नाटकाचा शुभारंभ

कबीर प्रॉडक्शन आणि सरगम क्रिएशनची प्रस्तुती असलेले इम्तियाज पटेल लिखित ‘ओवी’ हे नवे गुजराती नाटक रविवारी रंगमंचावर येतंय. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या रविवारी १५ जुलै रोजी गोवालिया टँक येथील तेजपाल हॉलमध्ये दुपारी ४ वाजता होणार आहे. महेश मांजरेकर आणि अजय कसुरडे यांची प्रस्तुती असलेल्या या नाटकात ध्रुमा मेहता, तोरल त्रिवेदी, नेहा पकाई, कृष्णा शाह आणि चिराग मेहता यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. अनिकेत पाटील यांचं दिग्दर्शन असलेल्या या नाटकात एका अशा टीनएज मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे जिचे आईवडील तिच्या लहानपणीच गेलेत. तिचं बालपण काकांकडे गेलंय. तिला अशा ठिकाणी राहायची खोली दिली जाते, जेथे आधी एका मुलीचा खून झालेला होता. तिला त्या खोलीत भुताटकीचा अनुभव येतो. त्यातून तिची सुटका कशी होते ते पाहायला नक्कीच मजा येईल.