अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मागील वर्षाची थकबाकी मिळणार

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाची थकीत रक्कम शाळांना तातडीने देण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना दिल्या आहेत. निरीक्षक कार्यालयातून शाळांच्या बॅक खात्याची माहिती मागविण्यात आली असून लवकरच शाळांना थकबाकी मिळणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या शुल्कापैकी काही रक्कम शाळांना देण्यात येते. मात्र गेल्या वर्षीच राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेची थकबाकी शाळांना मिळालेली नव्हती. ही रक्कम त्वरित मिळावी, यासाठी अशी मागणी करीत शिक्षक परिषदेने यंदाच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तसे पत्रच परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना दिले. याची दखल घेत अहिरे यांनी शाळांना थकबाकी देण्याच्या सूचना दिल्या.

वंचित घटकांच्या ऑनलाइन शाळा प्रवेश मुदतीत वाढ
वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के राखीव ठेवण्यात येणाऱ्या कोट्यासाठी ४ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले. या २५ टक्के प्रवेशाची पहिली लॉटरी १२ ते १३ मार्च २०१८ या कालावधीत काढण्यात आली, तर प्रवेश घेण्याची मुदत १४ ते २४ मार्च होती.