लीज संपलेल्या 600 मालमत्तांपैकी 300 मालमत्तांचे मूळ मालकच बेपत्ता

राजेश चुरी ,मुंबई

ब्रिटिशांनी मुंबई बेटावरील लीजवर (भाडेपट्टा) दिलेल्या 1300 मालमत्तांपैकी 600 मालमत्तांचे लीज संपुष्टात आले आहे. लीज वाढवून देण्यासाठी राज्य सरकारने मूळ मालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र कुलाब्यापासून माहीमपर्यंतच्या मोक्याच्या जागांवरील 300 मालमत्तांच्या मूळ मालकांचा शोधच लागत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या मूळ मालकांचा शोध सुरू आहे, पण या मूळ मालकांचा ठावठिकाणा लागला नाही तर 300 मालमत्तांवरील 99 वर्षांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ब्रिटिशांनी मुंबईतील 1300 मालमत्ता (प्रॉपर्टी) 99 ते 999 वर्षांच्या लीजवर दिल्या आहेत. लीजवरील या भूखंडांवर त्यावेळच्या मालकांनी इमारती बांधल्या, काही जागांवर रुग्णालये उभी राहिली, तर मरीन लाइन्स समुद्रकिनाऱयासमोरील मोकळय़ा जागेवरील लीज मालमत्तांवर क्लब उभे राहिले आहेत. त्यापैकी 600 मालमत्तांची लीज संपुष्टात आल्याने राज्य सरकारने मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱयांमार्फत मूळ मालकांना नोटीस पाठवून लीजचे नूतनीकरण करण्यास सांगितले. 300 मालकांनी लीजचे नूतनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे, पण 300 मालमत्तांच्या मूळ मालकांचा ठावठिकाणाच लागलेला नाही. कारण काही मूळ मालक परदेशात स्थायिक झाले, तर काही मालकांचे निधन झाले.

मोक्याच्या जागेवर मालमत्ता

ब्रिटिशांनी लीजवर दिलेल्या या मालमत्ता कुलाबा, नरीमन पॉइंट, ताडदेव, भायखळा अशा विभागांत आहेत. त्यातील काही मालमत्ता 20 हजार, 25 हजार, 15 हजार स्क्वेअर मीटर आकाराच्या आहेत. 99 वर्षांचे लीज संपुष्टात आल्यामुळे नियमाप्रमाणे आता या मालमत्ता राज्य सरकारच्या ताब्यात आल्या आहेत, पण लीजचे नूतनीकरण करण्यास सरकारने एक संधी दिली आहे.

तरीही मूळ मालकांचा शोध घेणार

दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या इमारतींमधील भाडेकरूंना मूळ मालकाचा ठावठिकाणाही माहिती नाही. ज्या इमारतींची लीज संपुष्टात आले आहे अशा मालमत्तांची यादी जिल्हाधिकाऱयांनी मध्यंतरी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती. लीज वाढवून देण्यासाठी राज्य सरकारने दिलेली मुदतही आता संपुष्टात आली आहे. पण तरीही शेवटची संधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा एकदा मूळ मालकांचा शोध घेण्यात येणार असल्याचे मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले.