GSTमुळे जनता सरकारवर नाराज, कर कमी करावाच लागणार-चिदंबरम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरात निवणुकीच्या दबावामुळे मोदी सरकार जीएसटीवरी टॅक्स कमी करत असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे. केंद्र सरकारची गुवाहटी येथे जीएसटी काउंसिलची बैठक आहे. या बैठकीत जीएसटीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. हॉटेलमधील जेवण तसेच इतर वस्तूवरील टॅक्समध्ये घट होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी चिदंबरम यांनी लागोपाठ ट्वीट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटीमध्ये काय त्रुटी आहेत याची माहिती काँग्रेसने पत्राद्वारे केंद्र सरकारला कळवली होती. त्यामुळे मोदी सरकार या त्रुटींकडे दुर्लक्ष करु शकत नाही, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. आजच्या बैठकीत काही वस्तूंवरील टॅक्स कमी होऊ शकतात. सरकार एवढ्या दबावात आहे की, टॅक्स कमी करण्याखेरीस त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचं चिदंबरम यांनी म्हटलं. सरकारने राज्यसभेत जीएसटीवर चर्चा करण्यास मनाई केली होती. मात्र आता जनतेसमोर सरकार जीएसटीवर चर्चा करण्यास नकार देऊ शकत नाही, असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.