राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज

श्यामला श्याम सावंत

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्र उन्नतीसाठी घालवले. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत श्रमतपस्या व यज्ञाद्वारे लोकांमध्ये जनजागृती करून या देशावर प्रेम करण्याची शिकवण महाराजांनी दिली. पीडितांना सहाय्य करणे, भक्तांकडून रक्तदान, नेत्रदान करून घेणे, अनाथ बालकांसाठी बालकाश्रम, असहाय्य महिलांसाठी महिलाश्रम, वृद्धाश्रम असे पवित्र कार्य त्यांनी केले. राष्ट्रसंत महाराजांनी भारतीय समष्टीधर्म मिशनच्या वतीने ईश्वराच्या अधिष्ठानाखाली कार्य करता यावे म्हणून समष्टी धर्म उपासना मंडळाचे जाळे विणले नि त्याच्या अनेक शाखा स्थापन करून त्याद्वारे प्रचारकार्य सुरू केले. १९२० पासून सेना, दले, मंडळे स्थापन करून अन्यायाविरुद्ध उग्र आंदोलने केली आणि प्रचाराकरिता कीर्तन, प्रवचन व व्याख्यानाचे वर्ग सुरू केले. पाचलेगाव, खडका, परळी, हैदराबाद, अकोला, दत्तवाडी, सोनपेठ, खपाटपिंपरी, वडगाव, महत्पुरी, गंगाखेड, भिवापूर, पिंपरा भिसी अशा अनेक गावांमध्ये ८ ते १२ हजार लोकांचा समुदाय घेऊन श्रमदान करीत सरकारचे अनुदान नसतानाही लाखो रुपयांची समाजसेवेची कामे महाराजांनी केली. मुंबई-मुलुंड येथे स्वखर्चाने मुक्तेश्वर आश्रम बांधून १९७४ पासून ४४ वर्षे चिन्मय पादुका महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होत आहे. याही वर्षी ३० ऑक्टोबर २०१७ रोजी मुख्य उत्सव असेल.