‘पद्मावत’वर आता पाकिस्तानात बंदीची टांगती तलवार

सामना ऑनलाईन । कराची

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपट हिंदुस्थानमध्ये झालेल्या प्रचंड विरोधानंतर बॉक्स ऑफिसवर झळकला आहे. परंतु आता पाकिस्तानमध्ये या चित्रपटाला विरोध होताना दिसून येत असून पद्मावत प्रदर्शनावर बंदी येण्याची शक्यता आहे.

या चित्रपटातून मुस्लिम लोकांना क्रूर दाखवण्यात आले असून इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लाहोर हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर चित्रपटावर बंदी आणण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे. तसेच पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाला पुन्हा एकदा चित्रपटाचा रिव्ह्यू करण्यास सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाकडून सदस्यांना याबाबत लिखित ऑर्डर आलेली नाही. असे असले तरी सदस्यांना बोर्डाच्या विशेष बैठकीसाठी बोलवण्यात आल्याचे लेटर मिळाले आहे. या बैठकीतच पद्मावतचा रिव्हयू होईल. त्यात चित्रपटातील दृश्य आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जातील. त्यानुसार या चित्रपटावरच्या बंदीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तपत्रांत देण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी पाकिस्तान सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरचे प्रमुख मोबशिर हसन यांनी न्यूज एजेन्सी आईएएनएस यांना सांगितले होते की, पद्मावत चित्रपटात आक्षेपार्ह असे काही नाही. चित्रपट समीक्षक आणि काही इतिहासकारांच्या परवानगी नंतर चित्रपटाला यू सर्टिफिकेट देण्यात आले आहे.