‘पद्मावत’ चित्रपटाने बुडवला शासनाचा महसूल

2

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

‘पद्मावत’ या चित्रपटाचा वाद कमी होत नसल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी प्रोडक्शनने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील मसाई पठार येथे पद्मावत चित्रपटाचे २० दिवस चित्रीकरण केले होते. मात्र चित्रीकरणासाठी नियमानुसार शासनाला देय असलेल्या एकूण १ लाख ९१ हजार ४५८ रुपयांपैकी १ लाख ६२ हजार ७४२ रूपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संजय लीला भन्साळी प्रोडक्शन्स यांच्याकडून याप्रकरणी दंडवसूली करावी आणि सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे या संदर्भातील तक्रार हिंदु विधीज्ञ परिषदेने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, वन विभागाचे क्षेत्रापाल आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पुराव्यांसह केली आहे.

संजय लीला भन्साळी प्रोडक्शन्स यांच्या वतीने ओंकार स्टेज सर्व्हिसेसचे दत्तप्रसाद अष्टेकर यांनी सर्व प्रकारच्या अनुमतींसाठी पत्रव्यवहार केला होता. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी करमणूक विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने अनुमती देतांना संबंधित व्यक्ती अन् संस्था यांची अनुमती घेण्याची अट घालण्यात आली होती; मात्र ती पाळण्यात आलेली नाही. सदर चित्रीकरण ६ मार्च ते ३० मार्च २०१७ या कालवधीत काही दिवस वगळता २० दिवसांसाठी करण्यात आले होते. यात २२ मार्च ते २४ मार्च २०१७ या कालावधीसाठी वन विभाग, कोल्हापूर यांच्याकडे तीन दिवसांचे २८ हजार ७१६ रुपयांचे नाममात्र शुल्क भरण्यात आले होते; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे ६ मार्च ते १४ मार्च २०१७, तसेच २१ मार्च ते ३० मार्च २०१७ पर्यंतचे शुल्क भरण्यात आलेले नाही. यात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. तसेच १५ मार्च २०१७ या दिवशी चित्रपटाच्या सेटला आग लागली होती. त्या दिवसाची पोलीस अनुमती न घेता जागा वापरण्यात आली होती. ही शासनाची फसवणूक आहे.