पद्मावतीवर सेन्सॉर बोर्डाने बेजबाबदार निर्णय घेतला!

सामना प्रतिनिधी । मुंबई

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी सेन्सॉर बोर्डाने दाखवली आहे. सेन्सॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार निर्णय घेतल्याचा आरोप मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी केला आहे. त्यामुळे पद्मावतीचा वाद काही संपताना दिसत नाही.

सेन्सॉर बोर्डाने सहा सदस्यांच्या समितीला बोलावले होते. आमचे काही प्रश्न होते. पण आम्हाला असे समजले की, दुसऱयाच एका समितीने चित्रपट बघून मंजुरी दिली आहे. आमच्या संमतीशिवाय चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. पद्मावती चित्रपटाच्या नावात बदल करणे हा निव्वळ दिखावा असल्याचे विश्वराज सिंह यांनी सांगितले.

पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवे असल्यास त्याचे नामकरण पद्मावत करावे, अशी सूचना सेन्सॉर बोर्डाने अलीकडेच केली आहे.

सामाजिक सलोखा धोक्यात

शूरवीरांची माहिती चुकीच्या पद्धतीने देण्यास सेन्सॉर बोर्ड पाठिंबा देत आहे, असा आरोप मेवाडच्या राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य महेंद्र सिंह यांनी केला आहे. चित्रपटामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. महेंद्र सिंह यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे. मलिक मोहम्मद जायसी यांची कविता पद्मावत वरून प्रेरित अशी काल्पनिक असल्याचे जाहीर करण्यात येणार आहे. तसे झाले तर केवळ संस्कृतीच नव्हे तर कविताही चुकीच्या पद्धतीने चित्रपटातून सादर होईल, असे महेंद्र सिंह म्हणाले.