भंसाळीवर देशद्रोहाचा खटला दाखल करा…सेन्सॉर बोर्डाच्या सदस्याचे गृहमंत्र्यांना पत्र

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती चित्रपटावरुन सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता या वादात सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने उडी घेतली असून भंसाळीवर देशद्रोहाचा खटला दाखल करा असे पत्रच गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिले आहे. अर्जुन गुप्ता असे पत्र लिहिणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्याचे नाव आहे.

चित्रपटात राणी पद्मावती यांची प्रतिमा डागाळण्यात आल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. राजस्थानच्या राजघराण्यातील अनेकजणांनी पद्मावती चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथित घटनांवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान भंसाळी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पद्मावती चित्रपटाबद्दल आपली बाजू स्पष्ट केली आहे. या चित्रपटात पद्मावती व अलाउद्दीन यांच्यात कुठलेही प्रणयदृश्य दाखवण्यात येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. करणी सेना व इतर राजपूत समाज प्रतिनिधींनी चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी आम्हाला दाखवावा अशी मागणी केली आहे.