सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चालणारा ‘खेळ’ बंद करा

मुंबई: सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवून भन्साळी राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण जनतेला दाखवतोय. मुजोर भन्साळीकडे एवढी हिंमत येतेच कुठून? कोल्हापुरातच काय, जगाच्या पाठीवर कुठेही ‘पद्मावती’ चित्रपटाचे शूटिंग असेल तरी आम्ही ते उधळून लावू, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराच रजपूत करणी सेनेने भन्साळीला दिला आहे.

रजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जयपूरपाठोपाठ कोल्हापुरातील ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरणही उधळून लावले आहे. कोल्हापूरला ‘पद्मावती’च्या सेटला लावण्यात आलेल्या आगीत चित्रपटाच्या सेटचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. महान पद्मावती राणीचे आणि अल्लाउद्दीन खिलजीचे प्रेमसंबंध दाखवणे म्हणजे हिंदू धर्माचा घोर अपमान आहे. ही गोष्ट देशासाठी घातक आहे. वारंवार भन्साळीला याबाबत इशारा देऊनही भन्साळीची मुजोरी सुरूच आहे. आम्ही त्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रजपूत करणी सेनेने देत कोल्हापुरातील सेटच्या नुकसानीची जबाबदारीदेखील स्वीकारली आहे.

पद्मावती’ चित्रपटावर सुरुवातीपासूनच आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोल्हापुरात शूटिंग सुरू असल्याची माहिती जयपूरच्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. वीजेंद्र सिंह कल्याणवत यांच्या नेतृत्वाखाली करणी सेनेच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तेथील शूटिंग उधळून लावले. यापुढेही या चित्रपटाला आमचा विरोध कायम राहील. – दलपतसिंग राठोड, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना