प्रसून जोशींच्या हाती सेन्सॉरची कात्री, निहलानींची उचलबांगडी

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ (सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षपदावरुन पहलाज निहलानी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून गीतकार आणि अॅडमेकर प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे.

पहलाज निहलानी १९ जानेवारी २०१५ पासून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बरेच वाद झाले. अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेन्सॉर बोर्डाच्या कामाच्या पद्धतीवर नाराज झाले होते. ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटांमध्ये निहलानी यांनी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती सुचवली होती. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टी विरुद्ध निहलानी असा सामना सुरू झाला. अखेर निहलानी यांची उचलबांगडी झाली.

याआधी निहलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अॅक्शन हिरो’ म्हणत आपल्या निष्ठा जाहीर केल्या होत्या. निहलानी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे असल्याचा आरोप झाला होता.