उमेदवारांमार्फत दिल्या जाणार्‍या पेड न्‍युजवर यंत्रणेचे लक्ष- जिल्हाधिकारी

सामना प्रतिनिधी, नगर

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून तसेच सोशल मीडियावर उमेदवार अथवा राजकीय पक्षांकडून केल्या जाणार्‍या जाहिरांतींना आता पूर्वप्रमाणन करून घ्यावे लागणार आहे. त्याशिवाय, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात द्विवेदी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रणाबाबत माहिती दिली. उमेदवार अथवा त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या राजकीय पक्षांच्या जाहिराती यांना प्रसारणपूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी ते करत असलेल्या जाहिरातीचा मजकूर आणि ऑडिओ/ व्हिडीओ यांची सीडी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रसारणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच प्रसारित करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात नोंदविणे आवश्यक आहे. विनापरवानगी कोणताही जाहिरात मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडियातून प्रसारित करण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी निवडणूक आयोगाने माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमध्ये सोशल मीडियातील मजकुरावर देखरेखीसाठी या क्षेत्रातील माहितगारास समितीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निवडणूक काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. याशिवाय, वर्तमानपत्रात उमेदवारांकडून दिल्या जाणार्‍या जाहिरातीवरही ही समिती लक्ष ठेवणार असून त्याचा अहवाल खर्च नियंत्रण समितीकडे पाठविला जाणार आहे.

उमेदवारांनी कोणत्याही स्वरुपात पेड न्यूजचा प्रकार करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. एकाच उमेदवारांविषयी विविध वर्तमानपत्रात वारंवार येणारा समान मजकूर, एकाच उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तविणारे वृत्तांकन, तसेच अन्य उमेदवारांऐवजी ठराविक उमेदवारच विजयी होणार असल्याची खात्री देणारा मजकूर अशा स्वरुपाचे पेड न्यूज प्रकार उमेदवारांनी टाळावे. जाहिरात स्वरुपातील असे वृत्त बातमीस्वरुपात पैसे अथवा वस्तूंच्या मोबदल्यात वर्तमानपत्रांना दिले जाऊ नये. तो पेड न्यूजचा प्रकार ठरेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना, तिचे कामकाजाचे स्वरुप, प्रमाणन आणि त्याचवेळी वर्तमानपत्रातील बातम्यांची छाननी अशा दुहेरी पातळीवर काम राहणार असल्याचे सांगितले. तसेच या समितीद्वारे इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि केबल नेटवर्क यांचेवरही देखरेख आणि संनियंत्रण राहणार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

यावेळी सदस्‍य सचिव तथा प्र.जिल्‍हा माहिती अधिकारी दीपक चव्‍हाण यांनी माध्‍यम प्रमाणिकरण व माध्‍यम सनियंत्रण समितीच्‍या माध्‍यमातून पेडन्‍यूज, प्रमाणन समितीचे कार्य, प्रमाणन समिती, जाहिरात प्रमाणन, प्रमाणन अर्जासाठी आवश्‍यक कागदपत्रे आदि बाबीबाबत सविस्‍तर माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्‍य क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सदस्य दिलीप वाघमारे, सदस्य गोकुळ औताडे, आदींसह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.