पैनगंगेचे पाणी

81

अनंत सोनवणे,[email protected]

पैनगंगा अभयारण्याच सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे तीन बाजूंनी पाण्यानं वेढललं असं एकमेव अभयारण्य असावं.

महाराष्ट्रातल्या उदंड जैविक समृद्धी लाभलेल्या अभयारण्यांपैकी एक म्हणजे यवतमाळ जिल्हय़ातल्या उमरखेड तालुक्यातले पैनगंगा वन्यजीव अभयारण्य. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असं हे अभयारण्य दोन दऱयांमध्ये विभागलं गेलंय. याचा काही भाग नांदेड जिल्हय़ातही येतो. पैनगंगा नदीच्या पाण्यानं हे जंगल अतिशय समृद्ध केलंय. या अभयारण्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेलं असं हे एकमेव अभयारण्य असावं.

हे जंगल मिश्र पानगळी प्रकारचं आहे. त्याचा बराचसा भाग सागाच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. त्यामुळे पानगळीचा मौसम सुरू झाला की जंगल मोकळं दिसू लागतं. ऊन वाढत जातं तसतसं जंगलातल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होऊन पाणीसाठे आटू लागतात. साहजिकच वन्यजीव निरीक्षणासाठी हा काळ अत्यंत सुयोग्य ठरतो. असं असलं तरी हिवाळा आणि पावसाळय़ातही आवर्जून भेट द्यावी, असंच हे जंगल आहे. या काळात इथल्या हिरवाईने मन प्रसन्न होतं. विशेषतः पैनगंगा नदीचा परिसर तर निसर्गप्रेमींच्या मनावर गारुड करतो. पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटू इच्छिणाऱयांना इथला सहस्त्रकुंड धबधबा आकर्षून घेतो. याशिवाय श्यामा कोलामची टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, शिवालय, सोनधाबी ही ठिकाणं इथं येणाऱया पर्यटकांच्या पसंतीस उतरतात.

इथलं चांगलं पर्जन्यमान आणि पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्यात वृक्ष-वेली-झुडुपांचं मोठं वैविध्य पहायला मिळतं. इथं साग, ऐन, खैर, बाभूळ, पळस, सावरी, मोह, धावडा, बेल, तेंदू, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड, बांबू, चिंच इत्यादी प्रकारचे वृक्ष आहेत. तसंच कुसळी, खस, तिरकडी, पवन्या, मारवेल वगैरे प्रकारचं गवतही इथं मोठय़ा प्रमाणावर आढळतं. याशिवाय वनौषधींच्या जवळपास २०० जाती या जंगलात अस्तित्वात आहेत. हिरवाईचं अशा प्रकारचं वैविध्य फार जंगलांमध्ये पाहायला मिळत नाही. वनस्पतीशास्त्र्ााच्या अभ्यासकांसाठी पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला भेट देणं म्हणजे एक अनोखी पर्वणी ठरते.

painganga-2

विविध प्रकारच्या गवतांच्या अस्तित्वामुळे साहजिकच या अभयारण्यात तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी आहे. या तृणभक्षी वन्यप्राण्यांमध्ये चितळ, चिंकारा, चौशिंया, काळवीट, नीलगाय, ससा इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. याशिवाय बिबळा, अस्वल, रानडुक्कर, रानकुत्रा, मुंगूस, उदमांजर, कोल्हा, साळिंदर, हनुमान वानर, रानमांजर हे वन्यप्राणीही इथं पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या अभयारण्यात वाघाचाही वावर असल्याचं म्हटलं जातं. इथं अजगर, घोणस, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा इत्यादी सरपटणारे प्राणीही आहेत.

पैनगंगेचा जलाशय आणि त्या भोवतालचा समृद्ध परिसर यामुळे या अभयारण्यात पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अधिवास आहे. इथं महाभृंगराज, कोतवाल, चिरक, चंडोल, भटनित्तर, लावा, गांधारी, नकल्या खाटीक, हळद्या, रानकस्तुर, माळटिटवी, पोपट, भारद्वाज, कोळीळ, टकाचोर, पांढऱया छातीचा खंडय़ा, शबल खंडय़ा, पाणकावळा, रंगीत करकोचा, उघडय़ा चोचीचा करकोचा, लहान व मध्यम बगळा, जांभळा बगळा, तांबड, कुहवा, सर्पगरुड, बेसरा, शित्का, शृंगी घुबड, जकाना, हळदीकुंकू बदक इत्यादी प्रकारचे पक्षी आढळतात.

हे अभयारण्य वर्षभर पर्यटकांसाठी खुलं असतं. प्रत्येक ऋतूत जंगलाचं वेगळं रूप इथं पहायला मिळतं. जंगलात स्वतःच्या वाहनाने फिरता येतं. त्यामुळे निवांतपणे वन्यजीव निरीक्षण करता येतं. अर्थात जंगल पर्यटन करताना जंगलाचे नियम पाळावे लागतात.

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…तीन बाजूंनी पाण्याने वेढलेलं एकमेव अभयारण्य

जिल्हा…यवतमाळ

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…३२४.६२ चौ. कि. मी.

निर्मिती…२५ फेब्रुवारी १९८६

जवळचे रेल्वे स्थानक…नांदेड (२६० कि.मी.)

जवळचे विमानतळ…नागपूर (२७०किमी)

निवास व्यवस्था…वन विभागाचं विश्रामगृह, किनवट शहरात खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…एप्रिल ते मे.

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या