मूड पोर्ट्रेट बघून पवार भारावले, चित्रकार भारत सिंह यांच्या कलाविष्काराला दिलखुलास दाद


सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रसिद्ध चित्रकार भारत सिंह यांनी साकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोट्रेट प्रदर्शनाला कलाप्रेमींचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. ‘शतम जीवम शरद’ या प्रदर्शनातून भारत सिंह यांनी पवारांचे विविध म्डूस् कॅनव्हासवर उतरवले आहेत. स्वत: शरद पवार यांनी प्रदर्शनाला भेट देऊन या ‘पवारफुल’ कलाविष्काराचा आनंद घेतला.

पोर्ट्रेट आर्टिस्ट भारत सिंह यांचे शरद पवारांवरील पोर्ट्रेट प्रदर्शन 18 सप्टेंबरपासून वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू आहे. येत्या 24 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते 7 या वेळेत हे प्रदर्शन रसिकांना बघता येईल. प्रदर्शनाला शरद पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भेट दिली. पवार यांनी सिंह यांच्या कुंचल्यातून साकारलेले प्रत्येक पोर्ट्रेट आणि स्केचेस बघितले. संपूर्ण प्रदर्शन बघून पवार भारावले. स्वतŠची अशी पोर्ट्रेट बघून खूप छान वाटतंय. अशा पद्धतीचे आर्टवर्क बघितले नव्हते, अशा शब्दांत त्यांनी भारत सिंह यांचे कौतुक केले. कोणत्या मूडस्चे चित्र सर्वाधिक भावले असे विचारले असता, ते सांगणे कठीण आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रदर्शनात पवारांचे भावदर्शन घडवणारी 14 पोर्ट्रेट सादर करण्यात आली आहेत. कधी विचारमंथन करणारे, कधी स्मितहास्य तर कधी खळाळून हसणारे, हात जोडून अभिवादन करणारी भव्य पोर्ट्रेट बघणे ही कलारसिकांसाठी पर्वणी आहे.