पैसा कर्मचारी पतसंस्थेची जागा चेअरमनने हडपल्याचा आरोप

सामना प्रतिनिधी । निलंगा

पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था निलंगाचे चेअरमन विनायक मोहिते व्हंताळे यांनी पतसंस्थेमध्ये १७ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप व्हाईस चेअरमन अजय पाटील यांनी केला असून त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

१९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेचे केवळ ३४ सभासद आहेत. या पतसंस्थेचे निलंगा बसस्थानकाजवळील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते आहे. चेअरमन विनायक मोहिते यांनी पतसंस्था कार्यालय खरेदी करण्यासाठी म्हणून पतसंस्थेच्या खात्यामधून तब्बल १७ लाख रुपये उचलले प्रत्यक्षात पतसंस्थेच्या नावाने कार्यालयासाठी जागा खरेदी न करता स्वतःच्या वैयक्तीक मालकी हक्कात खरेदी खत २ फेब्रुवारी २०१८ रोजी करुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे. पैसा पतसंस्थेच्या सदस्यांचा आणि चेअरमन विनायक मोहिते यांनी जागा मात्र स्वतःच्या नावावर खरेदी करुन सर्वांची फसवणूक केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या विनायक मोहिते यांची सखोल चौकशी करावी. त्यांना सहकार्य करणाऱ्या सहकारी, सहकार खात्यातील कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी यांचीही चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. त्यांच्या कडून पतसंस्थेची वसूली दंडासह वसूल करावी अशी मागणी व्हाईस चेअरमन अजय पाटील, प्रताप हिंगोले, उध्दव पाटील, बी. वैजनाथ यांनी केलेली आहे.