पैशांचा पाऊस भाग १६ -शेअर बाजारात ट्रेडिंग करावी की दीर्घकालीन गुंतवणूक

123

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

शेअर बाजारात सुरुवात करण्यासाठी बहुतेकजण डिमॅट अकाउंट ओपन करून गुंतवणूक करण्यासाठी स्वतःच्या मिळकतीनुसार किंवा स्वतःची पूर्वीची एखादी मुदत ठेव काढून किंवा अडचणीच्या काळासाठी ठेवेलेली रक्कम डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून तयारीत असतात आणि हीच केलेली घाई त्यांना पुढे मोठ्या अडचणीत आणते कारण ज्याप्रमाणे क्रिकेट खेळायचे ठरवताना त्याचा आधी फॉरमॅट ठरवावा लागतो जसे
• टी -२० क्रिकेट
• वन डे क्रिकेट
• टेस्ट क्रिकेट
त्याचप्रमाणे आपण शेअर बाजारच्या कोणत्या फॉरमॅट मध्ये आपण आपली सुरुवात करणार आहोत ते आधी ठरवणे गरजेचे आहे, नाहीतर ट्रेडिंगसाठी छोट्या नफ्यासाठी केलेला जेव्हा तोट्यात जातो तेव्हा नफ्यासाठी ५-५ वर्ष दीर्घकालीन गुंतवणूक आहे म्हणून थांबणारे, भांबावलेले खूप गुंतवणूकदार गेल्या ८-१० वर्षात बाजार पहिले आहेत. म्हणून शेअर बाजारात सुरुवात करताना स्वतःची स्वतःच्या आर्थिक स्तरावरून किंवा स्वतःवर असलेल्या जबाबदाऱ्या ओळखून योग्य नियोजन करा.

शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्याच्या खूप पद्धती आहेत त्यापैकी ३ महत्वाच्या पद्धती आपण बघू.

१. इंट्राडे ट्रेडिंग :-

रोजच्या रोज शेअर्सची खरेदी विक्री करणे आणि दिवसभरात नफा किंवा तोटा जे काही असेल ते घेऊन बाहेर पडणे म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. यामध्ये मार्केटचा कल खालच्या दिशेने असेल तेव्हा वरच्या भावाला शेअर्स विकून खालच्या भावाला खरेदीही करू शकतो. शेअर बाजारात पैसा उडतो फक्त तो पकडता आला पाहिजे तो प्रकार म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. दोन्ही बाजूला संधी उभ्या असतात मार्केट वर जाऊदे किंवा खाली तुम्ही दोन्ही बाजूला कमावू शकता. याच मृगजळात पुरेसा अभ्यास किंवा शिक्षण नसलेले लोक नियोजनाअभावी अंधाधुंध खरेदी-विक्री करतात म्हणून इंट्राडे ट्रेडिंग मध्ये १००% ट्रेडिंग करणाऱ्यापैकी ८०-९०% लोकांचे अकाउंट कधी खाली होते ते त्यांना कळतच नाही. इंट्राडे ट्रेडिंग वाईट नाही पण योग्य नियोजन नसेल तर तिथे मर्यादा राहत नाहीत.

२. शॉर्ट टर्म ट्रेडिंग :-

इंट्राडे ट्रेडिंग नंतरचा सर्वांचा जवळचा पर्याय म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग. म्हणजे एखादे शेअर्स खरेदी केल्यानंतर ते येत्या १५-३० दिवसात किंवा ३ महिने किंवा ६ महिन्यांसाठी त्यामध्ये मिळणाऱ्या नफ्या-तोट्यासाठी त्यामध्ये अल्पकालीन गुंतवणूक म्हणजेच शॉर्ट टर्म ट्रेडिंग. इथे बहुतेक वेळेला शेअर्समध्ये पुढील अल्प काळात होणारी ग्रोथ पहिली जाते, जसे की एखादी मिळालेली मोठी ऑर्डर किंवा कंपनीच्या उत्पादना साठी आलेली मोठी मागणी. इंट्राडेपेक्षा इथे धोका कमी असतो पण तरीही कंपन्या निवडताना त्या कोणत्या कॅटेगरीमधील आहे, तिचे व्यवहार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर होतात का ? आणि कंपनीबद्दल मिळालेली माहिती खरी आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे.

३. लॉन्ग टर्म ट्रेडिंग / इन्व्हेस्टमेंट :-

आज व्हाट्सअॅप वर जागतिक गुंतवणूकदार श्री. वॉरेन बफेट यांचा एक मेसेज सर्वांकडे फिरतोय आणि त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली हे प्रत्येक जण वाचतोय पण त्यातून आपण बोध घेतोय का ? तर नाही कारण आपण फक्त वॉरेन बफेट यांनी शेअर बाजारातून पैसा कमावला हेच डोक्यात घेतो आणि आपणही त्या काहीही अभ्यास न करता जातो. वॉरेन बफेट सरांनी शेअर बाजारातून पैसा कमावला पण त्या आधी केलेला अभ्यास आपण विसरतो आजही ९० च्या उंबरठ्यावर आलेला हा गुंतणूकदार दिवसातले ५-६ तास वाचन करतो. लॉन्ग टर्म गुंतणुकीमध्ये तुम्ही आज शेअर्स खरेदी करून पुढील भविष्यात ५-१०-२०-३० वर्ष थांबायची तयारी करून उतरणार असाल तरच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फायद्याची ठरेल. लॉन्ग टर्म गुंतवणूक करताना ज्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत तिचा व्यवसाय आपल्याला समजायला हवा, तसेच पुढच्या १०-२० वर्षात तो व्यवसाय कोणती उंची गाठू शकतो का ? आणि सर्वात महत्वाचे त्या कंपनी मागचे चेहरे (Management) कोण आहे हे बघणे गरजेचे आहे.

वरील ३ पद्धतीचा नीट विचार करा. आपल्या आर्थिक ध्येयानुसार किंवा आपल्या आताच्या गरजेनुसार आपण कोणत्या फॉरमॅट मध्ये बसू शकतो ते आधी ठरवा आणि एकदा का फॉरमॅट ठरला तर त्यासाठी नियोजन करा. योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. तुमच्या डोक्यात असलेली कृती त्यांना स्पष्ट सांगा त्यामध्ये काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला सुरुवातीलाच सावध करतील. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रवास लांब पल्ल्याचा आहे यासाठी आपली बायको किंवा नवरा यांना आधी विश्वासात घ्या, कारण आपण हिंदुस्थानी बचत करणे जाणतो पण बचत केलेली रक्कम पुढे गुंतवणूक करण्यासाठी कुठे तरी कचरतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीला जेवढे विश्वासात घ्याल त्यांच्याशी चर्चा कराल तर पुढे भविष्यात येणाऱ्या चढ-उतारांवर योग्य मात करू शकता. पुढे या गुंतवणूकरुपी वटवृक्षाला लागलेली फळं म्हातारपणी तुम्हालाच तर चाखायची आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या