पैशांचा पाऊस भाग ११ – IPO म्हणजे काय?

614

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

आज भारतात लाखो पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत, अशा कंपन्यांचे शेअर्स हे खाजगीरित्या विविध लोकांकडे आहेत आणि जाहीरपणे त्याची खरेदी-विक्री होत नाही. अशा जर कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्ट झाल्या तर या लिस्टिंगच्या प्रक्रियेसाठी पहिली प्रक्रिया असते ती म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफेरींग (IPO ). या आठवड्यात आलेला डीमार्ट कंपनीचा IPO ही शेअर्स मार्केट मध्ये लिस्ट करण्यासाठी आणलेला IPO होय. आज आपण IPO म्हणजे नक्की काय आणि IPO मध्ये शेअर्स घेण्याचा निर्णय घेण्या आधी कोणती पडताळणी करावी ते पाहूया.

यशस्वी उद्योजकाला त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि म्हणून तो वेळोवेळी कर्ज काढून, भागीदार जोडून किंवा मार्केटमध्ये शेअर्स विकून व्यवसायासाठी भांडवल उभं करत असतो. आज जागतिक स्तरावर असणाऱ्या कोणत्याही कंपन्या बघा, त्यांच्या उत्पादन आणि सेवांच्या बळावर जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पण यामध्ये सर्वात मोठा वाटा अशा असंख्य हातांचा आहे. ज्यांनी या कंपन्या लहान होत्या, तेव्हा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. आज इन्फोसिसमध्ये केलेल्या १०००० रुपये गुंतवणुकीचे कोट्यवधी रुपये झाले. पण जेव्हा ही इन्फोसिस लहान कंपनी होती तेव्हा १० हजार त्या कंपनीमध्ये गुंतवणारे तुमच्या माझ्यासारखे छोटे-मोठे गुंतवणूकदारच. सरळ शब्दात IPO म्हणजे एखाद्या उद्योजक समूहाने त्यांच्याकडे असलेल्या उद्योगाचे मोठ्या स्तरावर नेण्यासाठी लागणारी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी बाजारातून भांडवल उभारणी होय.

कोणत्याही कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी पाहायच्या ते आपण पाहूया ;-

१. कंपनीची प्राथमिक माहिती :-
२. कंपनीचे मालक (प्रमोटर्स/डायरेक्टर्स) कोण आहेत ?
३. कंपनीची उत्पादने / सेवा कोणत्या ?
४. कंपनीच्या उत्पादने /सेवा यांचे भविष्य उज्ज्वल दिसतंय का ?
५. कंपनी देत असलेल्या उत्पादने /सेवा एक व्यवसाय म्हणून तुम्हाला कळतंय का ?
६. कंपनीची गेल्या ५ वर्षांतील कामगिरी कशी आहे ?
७. कंपनीवर काही कर्जे आहेत का? आणि कंपनीच्या पूर्ण संपत्तीपेक्षा ती जास्त आहेत की कमी आहेत ?
८. कंपनीच्या इतर आर्थिक बाबी कशा आहेत ?
९. कंपनीच्या IPO बद्दल माहिती
१०. इश्यूची साईज केवढी आहे ? कंपनीला भांडवल किती जमा करायचे आहे ?
११. ऑफर भाव योग्य आहे की नाही ?
१२. इश्यू आणण्याचा हेतू काय ?
१३. इश्यूनंतर पब्लिककडे किती शेअर्स असतील आणि प्रमोटर्सकडे किती शेअर्स असतील.

वरील सर्व माहिती आज इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. त्यामुळे स्वतः अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही IPO मध्ये शेअर्स घेण्याची घाई करू नका. खूप वेळा IPO च्या माध्यमातून मोठया किमतीला शेअर्स पब्लिकच्या माथी मारले जातात. २००७ ला आलेल्या रिलायन्स पॉवरच्या माध्यमातून असेच झाले होते. पुढील लेखात आपण IPO साठी अर्ज कसा करायचा हे पाहू…..!

आपली प्रतिक्रिया द्या