पैशांचा पाऊस भाग ३२- पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन

4

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

आर्थिक नियोजन करताना आपण आतापर्यंत निवृत्ती नियोजन आणि विमा नियोजन पाहिले, आज आपण पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन कसे करायचे ते पाहू. तुम्हाला आठवत असेल तर आपले आई-वडील त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातही आनंदी राहायचे. तेव्हा ना क्रेडिट कार्ड होते ना गोल्ड वर लोन देणाऱ्या कंपन्या, तरी पण त्यांच्या जीवनात आर्थिक भीती जशा आपल्याला आज आहेत तेवढ्या प्रमाणात नसायच्या. यामागचे कारण जर पाहिले तर लक्षात येईल की आपल्याकडे जे उत्पन्न आहे त्यामध्ये कसे खर्च करायचे, किती बचत करायची, किती गुंतवणूक करायची याचे साधे व्यवस्थापन ही लोकं करायची. पैशाचे व्यवस्थापन हा आर्थिक जीवनाचा आत्मा आहे कारण जोपर्यंत तुम्हाला पैसा कसा हाताळायचा हे कळत नसेल तर तो तुमच्याकडे टिकणार नाही.

२०१५ मध्ये आम्ही एका संस्थेसाठी एक सर्वेक्षण केले होते त्यामध्ये २०-२५ वयोगटातील मुलांना २ प्रश्न विचारले

तुम्हाला जर आता रु. २५००० दिले तर तुम्ही कुठे खर्च कराल ?
तुम्हाला जर आता रु. २५००० दिले तर तुम्ही कुठे गुंतवणूक कराल ?

या प्रश्नांची उत्तरे जर पाहिली तर पहिल्या प्रश्नाला या तरुण पिढीने भरभरून उत्तर दिली. मी स्मार्टफोन घेईन, मी ipad घेईन. तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांच्या नाकी नऊ आले. कारण याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. मी माझ्या मम्मीकडे देईन किंवा मी गोल्ड घेईन किंवा बँकेत ठेवेन. अशी सुमार उत्तरे या स्मार्ट पिढीने दिली. वर वर पाहता हा विषय गंभीर वाटत नाही पण खरे सांगायचे म्हटले तर हा खूप मोठा अडथळा आहे. नोकरी-धंद्यासाठी उभे ठाकलेले हे स्मार्ट लोक यांना पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल तर उद्या २५००० काय लाखाचे पॅकेज मिळाले तरी त्यांना पुरणार नाही. बहुतेक जणांना वाटते की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही, पण माझ्याकडे येणारे बहुतेक ग्राहक चांगल्या मिळकतीतले आहेत ज्यांना महिन्याला लाखो कमवून सुद्धा कळतच नाही त्यांचे आर्थिक जीवन कुठे चालले आहे. लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्ही तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते. आज आपण पैशाच्या स्मार्ट व्यवस्थापनाचे काही घटक बघू.

१. महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंग वर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
२. तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा इच्छेनुसार नको.
३. तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेक जण यामध्ये अडकलेले असतात.
४. महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
५. क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकनारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
६. स्मार्ट कर्जे आणि वाईट कर्जे घ्या. हो स्मार्ट कर्जे म्हणजे अशी कर्जे ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात…जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात याविरुद्ध वाईट कर्जे म्हणजे अशी कर्जे जी महाग दराने मिळतात जसे की वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
७. तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थतीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठीही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
८. तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दी मध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात.
९. तुमचा परिवाराला घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूक समजून सांगा. जेणेकरून भविष्यात या गुंतवणूक त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
१०. आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यवसायिक लोकांचा सल्ला घ्या.

लक्षात घ्या एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे.