पैशांचा पाऊस भाग ३४- SWP म्हणजेच Systematic Withdrawal Plan

123
mumbai share market

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

आपण आतापर्यंत म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुकीचे SIP आणि STP हे पर्याय पहिले. SIP आणि STP हे दोन्ही पर्याय संपत्ती निर्माण करण्यासाठी मदत करतात. पण यातून संपत्ती निर्माण केल्यानांतर किंवा उतार वयात जेव्हा आपण नोकरी धंद्यामधून निवृत्त होण्याचा विचार आपल्या डोक्यात रेंगाळत असतात तेव्हा महिन्याला ठराविक रक्कम कशी मिळू शकते असा प्रश्न प्रत्येकाला पडू लागतो मग तो साधा शिपाई असो किंवा एखादा बँक मॅनेजर किंवा एखादा व्यवसायिक असो. या सर्वावर एक उपाय म्हणजे म्युचुअल फंड :- SWP म्हणजेच Systematic Withdrawal Plan.

आयुष्यात प्रत्येक जण जी काही धडपड करत असतो. त्यामागची करणे पाहिली तर सध्याच्या खर्चाचे नियोजन आणि भविष्यातील आर्थिक ध्येयाबरोबरच जीवनाच्या उत्तरार्धात आर्थिक नियोजनचे प्रश्न नाही म्हटले तरी डोक्यात थैमान घालत असतात. नोकरी-धंद्यातून निवृत्त होताना एक रक्कम हातात पडते. आयुष्यभर केलेल्या कष्टातून जमा झालेली रक्कम घेताना आनंद होतो. पण त्याच वेळेला यातून आयुष्याची पुढील २०-२५ वर्ष काढायची कशी असा मोठा प्रश्नही आ वासून उभा राहतो. पारंपरिक बँक मुदत ठेवीत किंवा इतर गुंतवणूक साधनात ठेवावी ही रक्कम तर त्यावर असलेले कर यातून हातात खूप तुटपुंजा परतावा मिळतो. अशा वेळेला योग्य पर्याय कोणता असे विचारणारे खूप जण आमच्या कार्यालयात येत असतात तेव्हा त्यांना जेव्हा आम्ही म्युचुअल फंड मधील SWP म्हणजेच Systematic Withdrawal Plan हा पर्याय समोर ठेवतो आणि त्याचे फायदे पटवून देतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भावात एक सुरक्षितता आलेली असते कारण हा पर्याय च त्यासाठी बनला आहे.

SWP … Systematic Withdrawal Plan. म्हणजे काय?
ज्याप्रमाणे आपण SIP मध्ये प्रत्येक महिन्याला काही रक्कम गुंतवत जातो त्याप्रमाणे SWP मध्ये प्रत्येक महिन्याला काही रक्कम आपल्या मूळ रक्कमेतून आपल्याला परत मिळत राहते आणि त्याच बरोबर गुंतवणूकही वाढत जाते.

SWP बद्दल उदाहरण :-
श्री. कोरगावकर नुकतेच निवृत्त झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या निवृत्तीची सर्व १५ लाख रक्कम म्युचुअल फंडच्या वार्षिक ९ टक्के परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवली आहे आणि स्वतःच्या आणि पत्नीच्या मासिक खर्चासाठी दरमहा १०००० ची SWP केली आहे. ही रक्कम त्यांना पुढील २०० महिने म्हणजेच १६.५ वर्ष हमखास मिळत राहील. म्हणजेच काय श्री. कोरगावकरांनी आपल्याकडे निवृत्तीचे भांडवल ९% परताव्यावर गुंतवणूक केली आणि स्वतःच्या मासिक खर्चासाठी ८% ने SWP ची योजना निवडली. यामुळे मिळणारा परतावा जास्त असल्याने त्यांना त्यांच्या निवृत्तीचा बऱ्यापैकी योग्य नियोजन केले आहे.

SWP ची वैशिष्ट्ये :-
आपणच ठरवलेली रक्कम दर महिना आपल्याला मिळत राहणे आणि त्याचबरोबर जर ती योजना इक्विटी पर्यायांमध्ये असेल तर कर ही वाचवण्यास मदत होते. कारण दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीवर कोणताही कर नसतो. यामुळेच SWP पर्याय हा निवृत्तीधारक साठी ऐवृत्ती नियोजनासाठी स्मार्ट पर्याय आहे पण अजून बऱ्याच जणांना गुंतवणूक पर्यायाबद्दल काहीच माहिती नाही आहे.

SWP च्या मर्यादा :-
SWP पर्यायामध्ये असलेल्या मर्यादा एकच ते म्हणजे SWP योजना निवडताना आर्थिक नियोजनकारचा सल्ला घेणे गरजेचे आहेत. कारण जर योजनेमधून मिळणार परतावा हा कमी असेल आणि आपण दरमहिन्याला मिळणारी रक्कम जास्त असेल तर मूळ भांडवल लवकर संपण्याची भीती असते अशा वेळेला आर्थिक नियोजनकारांशी चर्चा करून या मर्यादेवर मात करू शकतो.

काही चांगल्या SWP योजना

ICICI Prudential Balanced Fund – Growth option
Reliance Regular Savings Fund – Growth option
Tata Balanced Fund – Growth Option
Canara Robeco Balanced Fund – Growth option
Birla Sun Life Balanced 95 Fund – Growth option
SBI Balanced Fund – Growth option

लक्षात घ्या म्युचुअल फंड हा असा एक गुंतवणूक पर्याय आहे. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयासाठी पाहिजे तसा वापरू शकता. फक्त तो वापर करण्यासाठी आपल्याला या स्वतःला त्याबद्दल अधिक माहिती असायला हवी. तरच आपण आपल्याकडील असलेल्या पैशाला काम जास्तीत जास्त कामाला लावू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या