पैशांचा पाऊस भाग ४५- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती ३

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

दीर्घकाल मुदतीवर पैसे गुंतंवल्यास त्यातून मिळणारा प्रचंड परतावा कसा असतो ते आपण पाहिले. मात्र जॅकपॉट साठी नुसतेच दीर्घकालीन मुदतीवर पैसे गुंतवणे महत्त्वाचे नाही. त्याचबरोबर कंपनीची निवड सुद्धा महत्त्वाची आहे. वेगाने वाढणाऱ्या कंपन्या कोणत्या? त्याचबरोबर दीर्घकालीन टिकू शकणाऱ्या कंपन्या कोणत्या 1990 च्या दशकात सत्यम कंप्यूटर कंपनी तेजीत होती. आज तिचे अस्तित्वच नाही. कंपन्यामधील विश्वासार्हता सुद्धा महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची कला साध्य करता आली पाहिजे. (मी कालपासून दीर्घकालीन मुदतीने पैसे वाढतात हे सांगतोय. म्हणजे इतर ठिकाणी पैसे गुंतवायचे नाहीत का? तिथे कमी परतावा मिळतो का? जास्त परतावा मिळणाऱ्या अल्पकालीन योजना उपलब्ध नाहीतच का? असे अनेक प्रश्न मनात उमटतीलच. या सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळतील. सध्या चालू असलेल्या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करुयात.)

1981 मध्ये जेव्हा इन्फोसिस सुरू झाली तेव्हा आपल्यापैकी कोणीही 10000 रुपये लावण्याची risk जोखीम पत्करली असती का? अर्थातच नाही. कारण इन्फोसिस पुढे किती मोठी होणार हे त्यावेळी कुणालाच माहिती नव्हते. शिवाय इन्फोसिस सुरु झाली तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच त्या कंपनीविषयी माहिती होते. आज करोडो लोकांना या कंपनीविषयी माहिती आहे. लाखो लोकांकडे या कंपनीचे शेअर सुद्धा आहेत. किंवा उद्या इन्फोसिस एवढी होणारी मोठी कंपनी आज बाल्यावस्थेत असेल ती फार कमी लोकांना माहिती असेल. ती तेवढी मोठी होईल याचा पुसटसा अंदाजसुद्धा ते लावू शकणार नाहीत. याचा अर्थ असा होतो की भविष्यात जाऊन आपल्याला dots connect करता येत नाहीत.

भूतकाळ व वर्तमानकाळाच्या आधारावरच आपल्याला आपले निर्णय घ्यावे लागतील. योग्य कंपनीच्या निवडीविषयी लिहलेला लेख अर्थात आपण सर्वांनी वाचला असेलच. त्याशिवाय कंपनीचा आलेख कधीकधी उतरता सुद्धा असू शकतो. ज्या कंपनीने दररोज चढता आलेख दाखवला आहे, आजपर्यंत अशी कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे कंपनीचा उतरता आलेख असताना सुद्धा धीर धरणे गरजेचे आहे. विश्वासहर्ता असणाऱ्या, चिरकाल टिकण्याची क्षमता असणाऱ्या, वाढ दर्शवणाऱ्या, भविष्यात वाढू शकणाऱ्या कंपन्यामध्ये पैसे गुंतवणूक करून पडत्या काळातसुद्धा कंपनीच्या बरोबर राहून दीर्घकालीन मुदतीवर पैसे गुंतवल्यास अमाप नफा मिळवणे सहज शक्य आहे. रोज ट्रेडिंग करणारासांठी किंवा अल्पमुदत गुंतवणूकादारांसाठी काही टिप्स उद्यापासून देण्यात येतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगत चला. त्यामुळे तुम्हाला आवश्यक अशी माहिती देता येईल.