पैशांचा पाऊस भाग ५ : शेअर्स ची वर्गवारी ग्रूप A पासून ग्रूप Z पर्यंत!

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

गेल्या लेखात आपण ट्रेडिंग की दीर्घकालीन गुंतवणूक या महत्त्वाच्या विषयावर माहिती घेतली. आज आपण ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना कोणते शेअर्स निवडावे आणि त्यासाठी कोणती वर्गवारी असते ते पाहूया. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेताना जास्त महत्त्व आपण उपकरण बनवणाऱ्या कंपनीला देतो, त्यानंतर त्याच उपकरणाचे वैशिष्ट्य आणि किंमत पाहतो. या सर्व गोष्टींची योग्य खात्री झाल्यानंतर आपण ते उपकरण घेण्यासाठी बाजारात जातो. तसेच शेअर्स बाजारातही शेअर्स घेताना असाच अभ्यास करावा लागतो. शेअर्सरूपी वटवृक्षाला लागलेली फळे भविष्यात चाखायची असतील, तर आपल्याला शेअर्स बाजारातील मोती शोधावे लागतील. चला तर मग जाणूनन घेऊया “शेअर्स ची वर्गवारी ग्रुप A पासून ग्रुप Z पर्यंत!”

गुंतवणूकदाराचे हित लक्षात घेऊन बीएसईने त्यांच्या एक्सचेंजवर नोंदणी असलेल्या कंपन्याना काही वर्गवारीमध्ये विभागले आहे. हे वर्गीकरण A, B1, B2, S, T,TS & Z अश्या वर्गवारीत गुंतवणूकदारांच्या मार्गदर्शनासाठी केले आहे. या कंपन्यांचे वर्गीकरण करताना काही घटक लक्षात घेऊन करण्यात आले आहे. जसे, कंपनीचे भागभांडवल, कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी खरेदी विक्री, कंपनीचा नफा, दिलेला लाभांश (डिव्हिडंड) वरील मापदंडाव्यतिरिक्त आणि काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करून ही वर्गवारी केलेली असते.

BSE स्टॉक एक्सचेंजला शेअर्सची संख्या खूप असल्यामुळे शेअर्स गुंतवणूकदाराला योग्य कंपनी निवडण्यासाठी केलेली ही वर्गवारी खूप मोठी भूमिका बजावते. जसे मोबाइल हँडसेट घेताना बाजारात २००हून अधिक कंपन्या आहेत. पण जेव्हा हँडसेट घेण्याची वेळ येते, तेव्हा आपण पहिल्या २-४ प्रमुख कंपन्यांचाच विचार करतो. त्याचप्रमाणे शेअर्स बाजारातून संपत्ती निर्माण करण्यासाठी उतरलेल्या गुंतवणूकदारालाही BSEने केलेली वर्गवारी म्हणजे मोती आणि खडे बाजूला केल्यासारखी प्रक्रिया आहे.

कंपन्यांचे वर्गीकरण :-
Group A :- या वर्गवारीमध्ये लार्ज कॅपवाल्या जवळपास २०० कंपन्या आहेत. ग्रुप A या वर्गवारीत भाग भांडवल मोठ्या असलेल्या म्हणजेच बाजारातील प्रमुख कंपन्या असतात.

Group B :- ग्रुप B मध्ये अशा कंपन्या असतात की ज्या ग्रुप कंपन्यांचा मागोमाग आपली क्षमता राखून असतात. ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी याही कंपन्या योग्य असतात.

Group S :- BSE ने जानेवारी २००५ मध्ये ही वर्गवारी चालू केली. ग्रुप स या वर्गवारीला “BSE-Indonext” वर्गवारी हि म्हणतात. यामध्ये BSE च्या B ग्रुप मधील अशा कंपन्या आहेत ज्यांचे भागभांडवल ३ कोटी ते ३० कोटी आहे आणि यांचे सर्व व्यवहार ऑनलाईनद्वारे केले जातात.

Group Z:- हे वर्गवारी BSE ने १९९९मध्ये आणली. यामध्ये अश्या कंपन्या असतात ज्याच्या कागपत्रांची पूर्तता झालेली नसते. शेअर होल्डर्सच्या काही तक्रारी प्रलंबित असतात. NSDL किंवा CDSL या डिपॉझिटरीशी समन्वय झालेला नसतो. Z ग्रुप वर्गवारीच्या कंपन्या गुंतवणुकीसाठी किंवा ट्रेडिंगसाठी निवडणे म्हणजे आपल्या पैशाला आपणच धोक्यात घालणे असे होईल.
Group T:- या वर्गवारीत अशा कंपन्या असतात, ज्यांचे मार्केटमध्ये खूप कमी शेअर्स असतात. त्यामुळे रोजच्या व्यवहारावर यांना मर्यादा असतात. या शेअर्समध्ये तुम्ही डे-ट्रेडिंग करू शकत नाहीत. यांना trade to trade वर्गवारी हे बोलले जाते.
Group TS:- TS या वर्गवारीत येणाऱ्या कंपन्या या BSE-Indonext” सेगमेंट्समध्येही trade to trade व्यवहार होणाऱ्या कंपन्या असतात.

या सर्व ग्रुपव्यतिरिक्त अजून २ वर्गवारी आहेत. त्या म्हणजे Fixed Income Securities (Group F) आणि Government Securities (Group G). आपण अॅमझोन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन एखादी वस्तू घेताना जितके चौकस तितकेच शेअर्स बाजारामध्ये कंपनी निवडताना चौकस होणे गरजेचे आहे. कंपन्यांची वर्गवारी ही फक्त एक बाजू आहे. एक सामान्य गुंतणूकदार ते एक स्मार्ट गुंतवणूकदार या प्रवासात अजून खूप काही आपल्याला शिकायचे आहे. भेटू पुढील लेखात!