पैशांचा पाऊस भाग- ६ : जाणून घ्या -लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांची वर्गवारी.

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

शेअर बाजारात शेअर्समध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना नक्की कोणत्या कंपन्या निवडायच्या याबद्दल प्रत्येकजण विचारतात. मला जास्त धोका पत्करायचा नाही, मग मी कोणत्या कंपनीत गुंतवणूक करू? असे प्रश्न नवीन गुंतवणूकदारांकडून येतच असतात. तर मार्केटमध्ये कसलेले गुंतवणूकदार स्वतःचा पोर्टफोलिओ कसा दर्जेदार होईल, याकडे लक्ष देतात. तुम्हीही यांपैकी एक असाल तर हा लेख तुमच्यासाठी. मागील एका लेखात आपण BSE ने केलेली कंपन्यांची A, B, S, T आणि Z अशी वर्गवारी पहिली. आज आपण कंपन्यांच्या भांडवलांवरून जे मुख्य तीन प्रकार पडतात ते पाहू.
१. लार्ज कॅप
२. मिड कॅप
३. स्मॉल कॅप
वरील ३ मुख्य प्रकार हे कंपनीच्या बाजारातील भांडवलानुसार पाडले जातात. इथे कॅप म्हणजे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजारातील एकूण भांडवल होय. कंपनीचे बाजारातील एकूण भांडवल म्हणजे कसे काढतात ते पाहू.

बाजारातील एकूण भांडवल = कंपनीचे एकूण शेअर्स * शेअर्स ची बाजारातील किंमत
XYZ कंपनीचे भांडवल = १ करोड शेअर्स * रु. ४५००
XYZ कंपनीचे भांडवल = ४५०० करोड
याप्रमाणे कंपनी चे एकूण बाजारातील भांडवल काढले जाते. याच भांडवलाच्या आकारमानावरून या कंपन्यांचे वरील ३ मुख्य प्रकार पडतात ते आपण पाहू.

लार्ज कॅप : नावानुसार या प्रकारात लार्ज म्हणजे मोठया कंपन्या असतात, ज्यांचे बाजारमूल्य १०००० कोटींपेक्षा जास्त असते. लार्ज कॅप कंपन्या या बहुतेक नामांकित कंपन्या असतात. शेअर बाजारात या कंपन्यांच्या चढ-उताराला खूप महत्त्व असते. कारण या कंपन्या आकारमानाने मोठ्या असल्यामुळे या बहुतेक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये असतात. लार्ज कॅप कंपन्यांची नावे :- TCS, HDFC Bank, Reliance, Asian Paints .

मिड कॅप : या प्रकारात अशा कंपन्या येतात, ज्यांचे बाजारमूल्य १५०० कोटींपेक्षा जास्त परंतु १०००० कोटींच्या खाली असते. या मध्यम आकाराच्या असणाऱ्या कंपन्या लार्ज कॅपच्या वर्गवारीत बसण्यासाठी उत्सुक असतात. मिड कॅपमध्ये गुंतवणूक करताना कमीत कमी ५-१० वर्ष थांबायची तयारी असेल तर गुंतवणूक करावी. मिड कॅप कंपन्या :-Eicher Motors, Berger Paints, TVS Motors

स्मॉल कॅप : स्मॉल कॅप प्रकारात १५०० कोटींपेक्षा कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्या येतात. स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करताना तुमच्याकडे शेअर बाजारातील कंपनी निवडीचा चांगलाच अभ्यास आणि अनुभव असायला हवा. कारण जितकी कंपनी छोटी तितकी तिची माहिती घेणे कठीण. स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक करताना धोका पत्करायची क्षमता आणि दीर्घकालीन ध्येयाबरोबरच सतत कंपनीच्या बाजारातील स्थान, तिचे उत्पादन, तिचे प्रमोटर्स काय करतात याचा आढावा घेता आला पाहिजे. स्मॉल कॅप कंपन्या :- VRL Logistics, J Kumar Infraprojects, IndiaBulls Housing

लक्षात ठेवा प्रत्येक कंपनीचा प्रवास हा स्मॉल कॅपपासून ते लार्ज कॅप याप्रमाणेच होतो. त्यामुळे शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करताना या सर्व प्रकारच्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हव्या. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमचा पोर्टफोलिओ २०११ च्या विश्वविजेत्या हिंदुस्थानी क्रिकेट संघासारखा असायला हवा. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंग , वीरेंद्र सेहवागसारखे अनुभवी खेळाडू (लार्ज कॅप), महेंद्र सिंग धोनी, गौतम गंभीर (मिड कॅप), विराट कोहली(स्मॉल कॅप) असे सर्व पद्धतीचे खेळाडू होते. त्याप्रमाणेच स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना शेअर बाजारातील कंपन्यांचे प्रकार पाहून गुंतवणूक करा.