पैशांचा पाऊस भाग ७- शेअर बाजारातील गुंतवणुकीचा श्रीगणेशा

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

शेअर बाजार आणि शेअर्समधील गुंतवणूक म्हटले की सामान्य माणस दूर राहणेच पसंत करतात. परंतु त्यांच्या या मतामुळे किंवा कृतीने ते एक चांगली संधी दवडत असतात. कारण शेअर बाजारामध्ये तोटा सहन करावा लागलेल्या लोकांची त्यांना माहिती असते. पण, अभ्यासपूर्वक गुंतवणुकीच्या माध्यमातून शेअर बाजारात हजाराचे कोट्यवधींमध्ये रूपांतर करणारे अनेक यशस्वी गुंतणूकदार आज हिंदुस्थानी शेअर बाजारात आहेत. जर हे लोक करू शकत असतील तर एक सामान्य गुंतवणूकदारही आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून आपल्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी चांगली संपत्ती बनवण्याची क्षमता ठेवत असतो. फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि स्वतःला आर्थिकरित्या एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची गरज आहे. शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करणे अवघड आहे, पण अशक्य नाही. तर चला मग करूया शेअर बाजारातील गुंतवणुकीचा श्री गणेशा…

शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे शेअर्स घेणे आणि विकणे आणि या व्यवहारातून नफा पदरात पाडून घेणे असे प्रत्येक नव्या गुंतवणूकदाराला वाटते आणि यातून फक्त शेअर्स ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीतून मी माझे घर चालवू शकतो का? असा प्रश्न प्रत्येक नवख्या गुंतवणूकदाराला पडतो. तर, त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण शेअर बाजाराकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून पाहायला हवे. मुख्य स्रोताचे उत्पन्न म्हणजे आपण जे शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, अकाउंटंट, हॉटेल व्यवसायिक किंवा इतर जे काही बनलो आहोत त्यातून आलेले उत्पन्न होय. थोडक्यात जेव्हा आपण शेअर बाजाराचा श्रीगणेशा करायाचा विचार कराल तेव्हा नुकतेच नोकरीला लागलेले, अविवाहित असतो ज्यांच्यावर परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी नसते किंवा अल्प प्रमाणात असते. तर एखाद्या नामांकित कंपनीच्या उच्च पदावर काम करणारे मोठे अधिकारी किंवा विवाहित ज्यांच्यावर परिवाराची जबाबदारी असते. प्रत्येकाला घर चालवण्यासाठी लागणारा पैसा हा मूळ नोकरी-धंद्यातूनच यायला हवा, असे मानलं जातं. या मूळ नोकरी-धंद्यातील बचतीचा पैसा शेअर बाजारात गुंतवणूक करून उत्पन्नाचा दुसरा स्रोत किंवा भविष्यातील गरजा ज्या महागाईनुसार वाढत जाणार आहेत त्यांच्या तरतुदीसाठी करू शकतो.

हल्लीच्या सतत बदलत जाणाऱ्या राहणीमानाबरोबरच उत्पन्नवाढीला मर्यादा निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजाराकडे गुंतवणुकीचे एक चांगले साधन म्हणून पाहण्याची गरज आहे. अभ्यासपूर्वक केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक १२-१५% परतावा आणि तो सुद्धा करमुक्त मिळवता येऊ शकतो. शेअर बाजारात जवळपास ६००० कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २००० च्या आसपास शेअर्समध्ये व्यवहार होतात. आणि १००-२०० शेअर्सची नावे या ना त्या कारणाने टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रांमध्ये गाजत असतात. BSE आणि NSE असे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंजेस आहेत. BSE चा निर्देशांक सेन्सेक्स आहे (यामध्ये ३० कंपन्या असतात) आणि NSE चा निर्देशांक निफ्टी आहे (यामध्ये ५० कंपन्या असतात) हे दोन्हीही निर्देशांक त्यात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या दर ३ सेकंदाच्या हालचालीवर काढला जातो. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत शेअर बाजार चालू असतो. शेअर बाजारात होणारे व्यवहार हे ऑनलाइन किंवा ऑफलाईन (ब्रोकरद्वारे) करता येतात.

शेअर बाजाराचा श्री गणेशा करताना काही गोष्टी आपल्याकडे असल्याचं पाहिजेत-
१. थोडा धोका पत्करण्याची क्षमता
२. रोज नवीन शिकण्याची तयारी
३. थोडे नुकसान सोसण्याची तयारी
४. दीर्घकालीन ध्येय
५. शिस्त, शिस्त आणि शिस्त

वरील गोष्टीशी तुम्ही तयारी केली असेल तर “शेअर बाजार तुमच्यासाठी श्रीमंतीचे दरजावे तुमची वाट बघताहेत. कारण लक्षात ठेवा शेअर बाजार अनिश्चिततेने भरलेला आहे. पण या अनिश्चिततेत भविष्याच्या संधी उपलब्ध आहेत. पुढील भागात आपण शेअर बाजारातील तांत्रिक बाजू समजून घेऊ जसे की डिमॅट अकाउंट कुठे ओपन करायचे?, काँट्रॅक्ट नोट म्हणजे काय? ट्रेडिंगचे व्यवहार कसे होतात? ब्रोकर कसा निवडावा? ट्रेडिंगवर चार्जेस किती आणि कसे असतात? मोबाइल ट्रेडिंग कशी करायची ? आणि खूप काही… लक्षात ठेवा “Patience is the Name of Game” त्यामुळे संयम ठेवा.