सुलेखनकार अच्युत पालव साकारणार ‘अक्षरपैठणी’ची किमया

नमिता वारणकर

भरजरी पदर…मोरपंखी कलाकृती…जरीचे, वेलबुट्टीचे काठ… अशी आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख असलेली पैठणी आता नवं रूप घेऊन येतेय…सुलेखनकार अच्युत पालव साकारणार ‘अक्षरपैठणी’ची किमया.

महाराष्ट्रातील सर्वच स्त्रीयांच्या जिव्हाळ्याचे, मानाचे वस्त्र समजली जाणारी पैठणी… प्रत्येक महिलेला आपल्याकडे एकतरी पैठणी असावी, असे वाटत असते. पैठणीबाबत मनात जुन्या आठवणीही जपल्या जातात. संस्कृतीचा मान जपणाऱया या विविधरंगी वस्त्राचे प्रदर्शन रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे ४ ते ८ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव साडय़ांवर कॅलिग्राफी कलेची झलक दाखवणार आहेत. त्याची प्रात्याक्षिकेही उपस्थितांना प्रत्यक्ष या प्रदर्शनात पाहायला मिळतील. आपल्या या अनोख्या प्रयोगाविषयी ते सांगतात की, आपल्या पारंपरिकतेला वेगळं वळण देण्यासाठी  मी आणि माझे विद्यार्थी हा प्रयोग करत आहोत. सध्या पैठणी कारागिरांना त्यांचा श्रमाचा योग्य मोबदला मिळतोच, असं नाही. अशा वेळी पैठणीचं रूप बदललं, तर काय होऊ शकेल? असा विचार करून पैठणीवर कॅलिग्राफीचा वापर करावा, असं वाटलं.

महागडय़ा पैठणीवर कॅलिग्राफी कलाकृती साकारण्याची कल्पना कशी सुचली याविषयी ते सांगतात की, सतत काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो. यापूर्वी पंजाबी ड्रेस, साडय़ा तसेच इतर कपडय़ांवर कॅलिग्राफी डिझाइन केलं आहे. पैठणीसारख्या महाराष्ट्राच्या अतिशय महत्त्वाच्या वस्त्राचेही मोल वाढावे, याकरिता त्यावर कॅलिग्राफी करण्याचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. लोकांना जर ही कल्पना आवडली तर एक वेगळीच पैठणी त्यांना नक्कीच पाहायला मिळेल. तसेच जी स्री अक्षर पैठणी नेसणार तिलाही छान वाटायला हवं आणि बघणाऱयाला त्यातलं सौंदर्य आकर्षित व्हायला हवं याकरिता कविता, अक्षरं, कॅलिग्राफीतलं ग्राफीक मोराचं डिझाईन, पिसारा फुललेला मोर अशा प्रकारे पैठणीच्या रंगसंगतीनुसार पारंपरिक कलाकृतीला, अनोख्या शब्दांना, कवितांना कॅलिग्राफी कलाकृतीद्वारे एकत्र आणण्याचाही हा प्रयत्न असेल.

‘अक्षरपैठणी’ साकारणं… एक आव्हान

पैठणी आणि कॅलिग्राफी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, माझ्यासाठी संपूर्ण पैठणी हा एक मोठा कॅनव्हास आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या पैठणीवर कोणत्या प्रकारचं कॅलिग्राफी डिझाइन साकारलं जाईल, हे सांगता येत नाही. मुळात पैठणी आणि पैठणीवर केलेली कॅलिग्राफी कलाकृती या दोन्ही गोष्टी जर एखाद्या स्त्रीला पूरक ठरल्या तर या ‘अक्षरपैठणी’च्या प्रसिद्धीला वाव मिळेल. याकरिता पैठणीला कॅलिग्राफीच्या माध्यमातून साजेसं रूप देणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे, असं त्याचं मत आहे.

संस्कृती आणि कलांचा मिलाफ

आपले पारंपरिक सौंदर्य जपणे, विकसित करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे संस्कृती आणि कलांचा मिलाफ घडवून त्यामध्ये नवनिर्मिती करणे मला प्रेरणा देणारे आहे. म्हणून असे कौशल्यपूर्ण प्रयोग मला सतत करायला आवडतात. पैठणीवरील कॅलिग्राफी म्हणजेच ‘अक्षर पैठणी’ साकारणे हा त्यातीलच एक भाग आहे, अशी आपल्या कलेविषयी भावना अच्युत पालव व्यक्त करतात.