ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

सामना ऑनलाईन । मुंबई 

‘पाकिजा’ आणि ‘रझिया सुलतान’ या सिनेमांमधून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे वृद्धाश्रमात  निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गीता यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी ट्विटरवरून दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे त्यांचा मुलगा राजा याने त्यांना मागील वर्षी गोरेगाव येथील एआरव्ही रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी घरातील कोणीच न आल्याने त्यांना अंधेरीच्या वृद्धाश्रमात ठेवले होते. गेल्या वर्षभरापासून त्या मुलाची वाट पाहत होत्या, गीता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले पण त्यांनी अंधेरी येथील जीवनआशा या वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील कोणी येईल म्हणून त्यांचे पार्थिव दोन दिवस कूपर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, मात्र कोणीच पुढे न आल्यास सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.