पाकिस्तानात ईदच्या काळात बॉलीवूड, हॉलीवूडच्या सिनेमांना बंदी

सामना ऑनलाईन । कराची

पाकिस्तानात ईदच्या काळात बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या चित्रपटांच्या प्रदर्शनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक चित्रपट उद्योगाला फायदा व्हावा आणि स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. ईदच्या काळात बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या चित्रपटांमुळे स्थानिक चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत. तसेच स्पर्धेला तोंड द्यावे लागत असल्याने नुकसान होत असल्याचे सांगत पाकिस्तानी निर्माते, वितरक आणि सिनेमागृहांच्या मालकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. ईदच्या दोन दिवस आधी आणि सुट्टीनंतर दोन आठवडय़ांपर्यंत ही बंदी असेल. तसेच ऑगस्टमध्ये येणाऱया ईल उल अधादरम्यानही चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्यात येणार आहे.